मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर रिलीज होताच प्रेक्षकांनी तिच्या या टीझरवर प्रेमाचा वर्षाव केला. या सिनेमात सोनाली छत्रपती ताराराणी यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
झी २४ तासच्या अनन्य सन्मानच्या मंचावरुन सोनालीने या सिनेमातील पहिल्या गाण्यावर परफॉर्मन्स करुन तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचीच मने जिंकली आहेत. झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्यात आपल्याला सोनालीचा दमदार परफॉर्मन्स पाहता येणार आहे. या सिनेमात सोनालीचा लूक ते तिचे दमदार डायलॉग्स पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. पहिल्यांदाच सोनालीने झी 24 तासच्या अनन्य सन्मानच्या मंचावरुन या सिनेमातील तिचा लूक प्रेक्षकांसमोर आणला आहे.
याचबरोबर यानंतर या सिनेमाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि सोनाली कुलकर्णीने या सिनेमाविषयी गप्पाही मारल्या. यावेळी या सिनेमासाठी तुमच्या शुभेच्छांची सोबत हवी असं आवाहनही प्रेक्षकांना केलं आहे.
अनन्य सन्मान 2023... झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्याचं हे चौदावं वर्ष... शिक्षण, कला, पर्यावरण, क्रीडा, कृषी, सामाजिक कार्य, शौर्य अशा विविध क्षेत्रात दिमाखदार कामगिरी करणाऱ्या गुणीजनांना दरवर्षी गौरविण्यात येतं. यंदा समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणाऱ्या विभूतींचा झी 24 तास अनन्य सन्मान हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलं. यंदाचा अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे रानकवी अशी ओळख असलेले ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार ना. धों. महानोर यांना देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये रंगलेल्या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्तेही विविध क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वानं महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या अलौकिक व्यक्तिमत्त्वांनाही झी 24 तास अनन्य सन्मानानं गौरवण्यात आलं.