अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचे आरोप

बिग बींच्या अडचणीत वाढ   

Updated: Dec 26, 2020, 11:04 AM IST
अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचे आरोप  title=

मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमी फोटो, व्हिडिओ किंवा कविता शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही साता समुद्रा पार देखील आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील त्यांची एक पोस्ट देखील काही क्षणांतच व्हायरल होते. दरम्यान बिग बींनी सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली. ही कविता चाहत्यांच्या देखील चांगलीचं पसंतीस पडली. मात्र बिग बींनी शेअर केलेली कवीता चोरीची असल्याचा दावा एका महिलेने केला. 

टीशा अग्रवाल नामक महिलेनं बिग बींवर कविता चोरल्याचा आरोप केला. बिग बींनी शेअर केलेल्या चहाच्या कवितेवरुन वाद सुरु झाला आहे. टीशा अग्रवाल या महिलेने या कवितेवर हक्क दाखवला आहे. ही कविता आपली असून बिग बींनी शेअर करताना त्याचं क्रेडिट किंवा श्रेयदेखील दिलं नाही, असं टीशा यांनी म्हटलं आहे. 

एका न्यूज पोर्टलशी बोलताना टीशा यांनी बिग बींनी आपली कविता चोरल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या, '२४ एप्रिल २०२० मध्ये ही कविता लिहिली होती. माझी कविता मी फेसबुकवरही पोस्ट केली. माझीच कविता अमिताभ यांनी शेअर केली आहे. त्यामुळे मी लिहिलेल्या कवितेसाठी मला श्रेय मिळावे अशी मागणी मी केली आहे.' असं म्हणत टीशा यांनी बिग बींवर चोरीचा आरोप केला.