...म्हणून आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत केलं नाही काम, येणारा प्रत्येक चित्रपट नाकारत राहिला

Amrish Puri Birth Anniversary: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक दिवंगत अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा आज जन्मदिन असून यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. आपल्या अभिनयाची छाप सर्वांवर सोडणाऱ्या या अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी आघाडीचे सर्व अभिनेते प्रयत्न करायचे. पण आमीर खानने (Amir Khan) मात्र त्यांच्यासोबत येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला नकार दिला.   

शिवराज यादव | Updated: Jun 22, 2023, 01:10 PM IST
...म्हणून आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत केलं नाही काम, येणारा प्रत्येक चित्रपट नाकारत राहिला title=

Amrish Puri Birth Anniversary: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक दिवंगत अमरीश पुरी (Amrish Puri) यांचा आज जन्मदिन असून यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मिस्टर इंडिया (Mr India) चित्रपटातील खलनायक असो अथवा मग दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (Dilwale Dulhania Le Jayenge) मधील एक शिस्तप्रिय बाप असो. अमरीश पुरी यांनी प्रत्येक भूमिका तितक्याच ताकदीने निभावली आणि अजरामर करुन टाकली. आपल्या करिअरमध्ये त्यांनी प्रत्येक शैलीच्या भूमिका केल्या. पण खलनायक म्हणून त्यांना जास्त पंसती मिळाली. त्यांची छाप इतकी होती की, आघाडीचा प्रत्येक अभिनेता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असायचा. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यापासून ते शाहरुख खान (Shahrukh Khan) प्रत्येकासोबत त्यांनी काम केलं. पण या यादीत एक असा अभिनेताही आहे ज्याने आपल्या संपूर्ण करिअरमध्ये एकदाही अमरीश पुरींसह काम केलं नाही. 

हे नाव ऐकल्यावर कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण हे नाव आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान (Amir Khan). अमरीश पुरी आणि आमीर खान यांना एकत्र चित्रपट ऑफर झाला नाही अशातली गोष्ट नाही. पण हे जाणुनबुजून घडलं आहे. यामागे अमरीश पुरी यांनी आमीर खानचा केलेला अपमान कारणीभूत आहे. तो अपमान आमीर खानच्या इतका जिव्हारी लागला की त्याने अमरीश पुरी यांच्यासह कधीच काम न करण्याची शपथच घेतली होती. 

असं नेमकं काय झालं होतं याची उत्सुकता आता तुम्हालाही लागली असेलच. तर ही 1985 मधील गोष्ट आहे, जेव्हा आमीर खानने बॉलिवूडमध्ये पदार्पणही केलं नव्हतं. त्यावेळी तो आपला काका आणि दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. यावेळी ‘जबरदस्त’ या चित्रपटाचं शुटिंग तेव्हा सुरु होतं.

नासिर हुसैन यांच्या ‘जबरदस्त’ चित्रपटात कलाकारांची मोठी फौज होती. संजीव कुमार, सनी देओल, राजीव कपूर, जया प्रदा आणि अमरीश पुरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. आमीर खानकडे त्यावेळी चित्रपटाच्या अॅक्शनची जबाबदारी देण्यात आली होती. आमिर खान योग्य पद्धतीने सीन शूट करुन घेईल याची खात्री असल्याने नासिर हुसैन आराम करण्यासाठी गेले होते. 

आमीरने अमरीश पुरी यांनी सगळा सीन समजावून सांगितला होता. पण जेव्हा सीन शूट होत होता तेव्हा आमीरला तो हवा त्या पद्धतीने होत नसल्याचं लक्षात आलं. त्यामुळे आमीर वारंवार त्यांना रोखत होता. एका क्षणानंतर अमरीश पुरी यांचा संताप झाला आणि त्यांनी आमीर खानला सुनावलं. 'हा कालचा मुलगा, आता मला समजावणार' असं म्हणत सर्व युनिटसमोर त्यांनी आमीर खानचा अपमान केला.

दरम्यान, नासिर हुसैन जेव्हा सेटवर परतले तेव्हा त्यांना नेमकं काय झालं याची माहिती मिळाली. त्यांनी अमरीश पुरी यांना बाजूला नेलं आणि समजावलं. आमिर खान आपला भाचा असून दिग्दर्शन शिकत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच तुम्ही खरंच सीन चुकीचा करत होतात. आमिर त्याच्या जागी योग्य आहे असंही त्यांनी समजावलं.

यानंतर अमरीश पुरी यांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी सर्वांसमोर आमीर खानची माफी मागितली. खरं तर इतरांसाठी हे प्रकरण संपलं होतं. मात्र आमीर खान तो अपमान कधीच विसरला नव्हता. यामुळेच त्याने अमरीश पुरी यांच्यासह कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही एखाद्या चित्रपटात अमरीश पुरी असतील तर तो चित्रपट करण्यास तो सरळ नकार द्यायचा. यामुळे तुम्हाला एकाही चित्रपटात हे दोन दिग्गज अभिनेते एकत्र दिसले नाहीत.