मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बॉक्स ऑफिसवरील यशाचं समीकरणं जणू ठरलयं. पण बॉलिवूडचा हा मिस्टर परफेक्शनिस्ट इतर निर्मात्यांसाठीही लकी ठरतोय.
दिवाळीचा मुहूर्त साधून 'गोलमाल अगेन' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' हो दोन सिनेमे या विकेन्डला प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांमध्ये 'काँटे की टक्कर' बघायला मिळतेय. पण या बॉक्स ऑफिस वॉरमध्ये 'गोलमाल अगेन'ने बाजी मारली आहे. रोहित शेट्टीच्या 'गोलमाल अगेन'ला पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग मिळालं आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल 32 कोटींचा गल्ला जमवला आहे. सगळ्यात जास्त ओपनिंग मिळवणारा या वर्षातील हा दुसरा सिनेमा ठरला आहे. तीन दिवसांमध्ये या सिनेमाने 88 कोटींची दमदार कमाई केली तर दुसरीकडे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार या सिनेमाने चार दिवसांमध्ये 34 कोटींची कमाई केलीय. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला समीक्षकांनी गौरवलंय. पण, रसिकांनी मात्र पहिल्या दिवशी या सिनेमाकडे पाठ फिरवली होती.
पहिल्या दिवशी या सिनेमाने केवळ पाच कोटींची कमाई केली होती. पण माऊथ पब्लिसिटीचा फायदा या सिनेमाला झाला आणि नंतर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच पकड घेतली. सिनेमाचं प्रमुख आकर्षण ठरली दंगल फेम झायरा वसीम... एका युवतीचा गायिका बनण्याचा प्रवास या सिनेमातून रेखाटण्यात आलाय.
एकंदरीत मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा दुसऱ्या सिनेमासाठी लकी ठरला आहे. आतापर्यंत आमिरच्या अपोझिट जेही सिनेमे प्रदर्शित झालेत सगळ्यांनीच बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केलीय.
1989 साली आमिरचा 'दिल' आणि सनी देओलचा 'घायल' हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरले होते. 1990 साली आमिरच्या जवानी झिंदाबाद बरोबर आशिकीची स्पर्धा होती. आमिरचा सिनेमा हिट झाला तर आशिकीहा ब्लॉकबस्टर ठरला होता.
1991 साली रेखाच्या 'फुल बने अंगारे' या सिनेमाची स्पर्धा आमिरच्या 'दिल है की मानता नही'शी होती...दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं होतं...
1995 साली तर किंग खान शाहरुख आणि आमिरची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा रंगली होती. शाहरुखच्या 'राम जाने' आणि आमिरच्या 'अकेले हम अकेले तुम' दोन्ही सिनेमांनी चांगलं यश मिळवलं होतं.
त्यानंतर 2001 साली जे झालं ते सगळ्यांनाचं माहिती आहे. कारण 2001 मध्ये पुन्हा एकदा आमिर आणि सनी देओल आमने-सामने आले... आमिरचा 'लगान' आणि सनी पाजीचा 'गदर-एक प्रेमकथा' हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले होते.
2007 मध्ये आमिरची स्पर्धा खिलाडी अक्षय कुमारशी होती... अक्षयचा 'वेलकम' आणि आमिरचा 'तारे जमीन पर' हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. अक्षयचा वेलकम ब्लॉकबस्टर ठरला होता तर आमिरच्या सिनेमालाही चांगलं यश मिळालं होते.
आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झालीय. रोहित शेट्टी आणि टीमसाठी आमिर खान लकी ठरला आहे. एकीकडे आमिरचा सिक्रेट सुपरस्टार बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतो आहे तर दुसरीकडे गोलमाल अगेन ब्लॉकबस्टर ठरलाय.