पासपोर्ट न दाखवताच जाणारी ग्लोबल स्टार केटी पेरी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

तिचं हे वागणं अनेकांनाच रुचलं नाही   

Updated: Nov 18, 2019, 06:03 PM IST
पासपोर्ट न दाखवताच जाणारी ग्लोबल स्टार केटी पेरी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर  title=
पासपोर्ट न दाखवताच जाणारी ग्लोबल स्टार केटी पेरी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

मुंबई : काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपास आलेली अमेरिकन गायिका केटी पेरी ही भारतात आली होती. ती भारतात आल्यामुळे हिंदी कलासृष्टी अर्थात बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी एका खास पार्टीचं आयोजन करत तिची भेटही घेतली. भारतभेटीवर आलेल्या या ग्लोबल स्टारचीच चर्चा सोशल मीडियापासून कलाविश्वापर्यंत पाहायला मिळाली होती. पण, परतीच्या वाटेवर निघालेली असताना मात्र विमानतळावरील तिचं वागणं अनेकांना खटकलं. 

सध्या सोशल मीडियावर केटी पेरी हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती विमानतळावर असल्याचं लक्षात येत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असल्यानुसार केटी कारमधून बाहेर येतात काही चाहते तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि तिची सही घेण्यासाठी म्हणून पुढे आले. त्यातील काहींना प्रतिसाद दिल्यानंतर ती पुढे गेली. 

पुढे गेली असता, नियमांनुसार केटीला विमानतळावर असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रवेश देण्यापूर्वी पासपोर्टची विचारणा केली. त्यांनी असं विचारताच केटी आणि तिच्यासोबत असणाऱ्यांनी दुर्लक्ष करत त्यांना न जुमानता पुढे जाण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. 

सोशल मीडियावर जेव्हा याविषयीचे व्हिडिओ पोस्ट केले गेले तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांप्रती तिची अशी ही वागणूक अनेकांना धक्का देऊन गेली. ज्यावर कित्येकांनी स्पष्ट शब्दांमध्ये नाराजीही व्यक्त केली. अनेकांनी भारतात असं करत असल्याचं म्हणत हेच तुमच्या देशात केलं असतं तर त्यावर कडक कारवाई करण्याच आली असती, असं म्हणत तिला निशाण्यावर घेतलं. 

नियमांची पायमल्ली करत ज्यांच्याकडे अनेकजण आदर्श म्हणून पाहतात अशाच सेलिब्रिटी मंडळींकडून ज्यावेळी चुकीची वर्तणूक पाहायला मिळते तेव्हा मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात नाही, याचाच प्रत्यय सध्या येत आहे.