Mrunal Dusanis Salary Experience : मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस ही कायमच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या लोकप्रिय मालिकेतून ती घराघरात पोहोचली. काही वर्षांपूर्वी अभिनेता शशांक केतकरसोबत मृणालने 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता मंदार देवस्थळीने केले होते. या मालिकेतील अनेक कलाकारांनी आमचे पैसे चुकवले असा आरोप मंदार देवस्थळींवर करण्यात आला होता. आता याबद्दल मृणाल दुसानिसने एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे.
मृणाल दुसानिसने 'सेलिब्रेटी कट्टा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या मालिकेतील मानधन बुडवल्याबद्दलच्या चर्चांवर भाष्य केले. यावेळी ती म्हणाली, "खरंतर आता त्या घटनेबद्दल बोलून काहीच फायदा नाही. कारण, जो काही फायदा व्हायचा होता तो तेव्हा होणं गरजेचं होतं. मी त्या मालिकेत अतिशय मनापासून काम केलं होतं. त्यामुळे मी थोडीशी हळवी झाले होते. त्यावेळी माझी मनस्थिती फारच नाजूक होती, कारण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर करणं हा माझा स्वभाव कधीच नव्हता."
"कलाकारांचं कसं असतं... जोपर्यंत काम सुरु आहे, तोपर्यंत त्यांना पैसे मिळतात. एकदा काम संपलं की, पुढचं काम मिळेपर्यंत त्यांना सगळं नियोजन करावं लागतं. त्यावेळी माझ्या इन्व्हेस्टमेंट वगैरे काहीच नव्हत्या. जेव्हापासून मला कळू लागलं तेव्हापासून माझा खर्च मी करते. तेव्हा माझ्या वडिलांचे शेवटचे दिवस असूनही मला कुटुंबाला वेळ देता आला नाही. मी व्यवस्थित काम केलं. अशावेळी मोबदला मिळत नाही, तेव्हा खरंच वाईट वाटतं. शशांकला त्याने पूर्ण पैसे दिले आता त्याचा फक्त टीडीएस राहिलाय. पण, तुम्ही इतरांना निम्मे तरी पैसे द्यायचे. ते गरजेचे होते", असे मृणाल म्हणाली.
"पण आता यापुढे काम करताना मी आर्थिक बाबींवर आवर्जुन लक्ष ठेवणार आहे. मी इतर बऱ्याच प्रोडक्शन हाऊसबद्दल ऐकलंय अशी परिस्थिती सगळीकडे नसते. मला याआधी काम करूनही असा अनुभव कधीच आला नव्हता. त्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव प्रचंड शॉकिंग होता. मला अनेकांनी आधीच अलर्ट केलं होतं की, इथे काम करु नकोस पण मी त्यांचं ऐकलं नाही. ही एक गोष्ट सोडली तर, तो उत्तम दिग्दर्शक आहे. माझी पहिली ऑडिशन त्यानेच घेतली होती. यापुढे, त्याच्याबरोबर प्रोडक्शन म्हणून मी काम करू शकणार नाही…मला भीतीच वाटते. पण, याव्यतिरिक्त दिग्दर्शक म्हणून सांगायचं झालं, तर तो ग्रेटच आहे." असे मृणाल दुसानिसने म्हटले.
दरम्यान मृणाल दुसानिस ही ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. त्यानंतर ती आम्ही सारे खवय्ये, तू तिथे मी, हप्ता बंद, अस्सं सासर सुरेख बाई, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेत झळकली.