Actress Accused Producer : 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री कृष्णा मुखर्जीविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. कृष्णानं 'शुभ शगुन' या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. त्याशिवाय तिचा लैंगिकछळ केल्याचं सांगत ती काही महिने आजारी असल्याचे देखील तिनं सांगितलं होतं.
कृष्णा मुखर्जीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. कृष्णानं सांगितलं की 'शुभ शगुन' या मालिकेत काम करताना तिला भयानक अनुभव आला. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि तिला एंग्जाइटीचा त्रासही होऊ लागला होता. ही पोस्ट शेअर करत कृष्णा म्हणाली की "मला कधी माझ्या मनात असलेल्या गोष्टी सांगण्याची हिंमत झाली नाही, पण मी ठरवलं की आता हे सगळं मी माझ्या मनात ठेवणार नाही. मी एका वाईट काळातून जात होते आणि गेली दीढ वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होती. मी चिंतेत आहे आणि जेव्हा मी एकटी असते तेव्हा खूप रडते. हे सगळं तेव्हा सुरु झालं, जेव्हा मी दंगल टीव्हीसाठी माझा शेवटचा शो शुभ शगुन करण्यास सुरुवात केली होती. हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात चुकीचा निर्णय होता. "
कृष्णानं सांगितलं की "तिची इच्छा नसताना तिनं दुसऱ्यांचे ऐकून हा शो करण्याचा निर्णय घेतला. काय म्हणाली कृष्णा, प्रोडक्शन हाऊस आणि निर्माता कुंदन सिंगनं मला अनेकदा त्रास दिला. मी आजारी होते आणि त्यांनी मला मेकअप रुममध्ये बंद केलं. ते माझ्या मेकअप रुमचा दरवाजा ठोकत होते असं वाटतं होतं जणू काही ते त्या दरवाज्याला तोडतील आणि हे पण तेव्हा जेव्हा मी कपडे बदलत होती. मला मानधन देखील मिळालं नाही. त्यामुळे मी शूटिंग न करण्याचा निर्णय घेतला."
हेही वाचा : पहिल्या पत्नीनं संतापून लागवली होती कानशिलात; आमिर खाननं पहिल्यांदाच केला खुलासा
कृष्णानं पुढे सांगितलं की तिला निर्मात्यांकडून धमक्याही येत होत्या. त्यामुळे तिनं काही न सांगण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यानं ती इतकी घाबरली की ती दुसरे प्रोजेक्ट्स करत नव्हती. तिनं पुढे सांगितलं की तिला पाच महिन्याचा मानधन मिळालं नाही. ती प्रोडक्शन हाऊस आणि दंगल चॅनलकडे गेली पण तिला काही उत्तर मिळालं नाही. कृष्णानं सांगितलं की तिनं अनेकांकडून मदत मागितली, पण त्या प्रकरणात कोणी काही केलं नाही. आता तिला असुरक्षित असल्याचं वाटू लागलं आहे.