मुंबई : 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता विकी कौशल सध्याच्या घडीला बऱ्याच तरुणींच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्याच्या कारकिर्दीत 'उरी....'च्या निमित्ताने एक सुरेख असं वळण आलं. यातच त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्याही चर्चा रंगल्या. अभिनेत्री हरलीन सेठी हिच्यासोबतचं त्याचं रिलेशनशिप सर्वांसमोर ज्या वेगाने उघड झालं त्याच वेगाने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनाही उधाण आलं. विकीच नव्हे आता तर, खुद्द हरलीननेही त्यांच्या या नात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत हरलीनने तिचं विकीसोबत असणारं एकंदर समीकरण आणि या नात्याची एक वेगळी बाजी सर्वांसमोर ठेवली. 'अगदी प्रामाणिकपणे सांगावं तर, मला त्या गोष्टीचा (ब्रेकअपचा) काहीच फरक पडला नाही. पण, हो त्या गोष्टींचा परिणाम हा माझ्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर झाला. एक व्यक्ती म्हणून आपल्या प्रत्येकाचं व्यक्तीमत्वं हे वेगळं आहे. फक्त एका चित्रपट अभिनेत्यासोबत माझं नाव जोडलं गेलं आणि फक्त मी अजून एकाही चित्रपटात काम केलं नाही यामुळे माझं महत्त्वं कमी होतं असा याचा अर्थ मुळीच होत नाही', असं हरलीन म्हणाली. आपण आताही स्वत:वर तितकंच प्रेम करत असून, हरलीन सेठी हीच आपली खरी ओळख असल्याचं ती म्हणाली. कोणाला तरी आपला एक्स बॉयफ्रेंड (पूर्वाश्रमीचा प्रियकर) म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल, असंच मत या मुलाखतीत तिने मांडलं. आपण कोणाचीतरी पूर्वाश्रमीची प्रेयसी (एक्स), सध्याची प्रेयसी किंवा भविष्यातील प्रेयसी नाही असं म्हणत मी हरलीन सेठी आहे ही बाब तिने अधोरेखित केली.
अभिनेता विक्रांत मेसी याच्यासोबत 'ब्रोकन इज ब्युटीफूल' या वेबसीरिजमध्ये झळकलेल्या हरलीनला तिच्या अभिनय कारकिर्दीवर ब्रेअपचा काही परिणाम झाला का, अशी विचारणाही करण्यात आली. त्यावरही एका अभिनेत्रीच्याच दृष्टीकोनातून हरलीनने उत्तर दिलं. 'अभिनेत्री म्हणून खऱ्या जीवनातही सर्व प्रकारच्या भावनांचा सामना करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जे काही घडलं ते चांगलंच घडलं', असं हरलीन म्हणाली.
विकीसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर हरलीलने इन्स्टाग्रामवर एक अत्यंत बोलकी पोस्ट लिहिली होती. आपण कोण होतो आणि आता आपण ज्या टप्प्यावर आहोत, आतापर्यंतच्या आयुष्यात ज्या गोष्टींचा सामना केला आहे याविषयीच्या सुरेख ओळी तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिल्या होत्या.