मुंबई : छोट्या पडद्यावरील 'स्वर्ण घर' या मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री संगीता घोषने तिला सात महिन्यांची मुलगी असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. आतापर्यंत संगीताने मुलीला जन्म दिल्याची बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संगीता हिने मुलीला जन्म दिला होता. चाहत्यांपासून ही गोष्ट का लपवली याचा खुलासा संगीताने आता केला आहे. संगीताने रजवी शैलेंद्र सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. लग्ना झालं आणि त्यानंतर तब्बल सहा वर्षे संगीताने कामातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर २०१३ मध्ये छोट्या पडद्यावर पुनरामन केलं होतं.
संगीताने तिच्या मुलीचं नाव देवी असं ठेवलं आहे. संगीताच्या मुलीचा जन्म २५ डिसेंबर २०२१ रोजी झाला. 'ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत संगीताने सांगितलं की "आमच्यासाठी तिच्या जन्मावेळचा काळ हा खूप कठीण होता, तिचा जन्म वेळेआधी झाल्यानं जवळपास १५ दिवस एनआयसीयूमध्ये ठेवावं लागलं होतं. असं नाही की आम्ही ही गोष्ट लपवली होती, तर जोपर्यंत याबद्दल योग्य वेळ आलीय असं वाटत नाही तोपर्यंत आम्ही न सांगण्याचा निर्णय घेतला होता. कधी कधी वाटायचं की हे खरं आहे का? माझा विश्वास बसायचा नाही. मी पतीला चिमटा काढायला सांगायचे. देवी खूपच आनंदी राहणारी मुलगी आहे, ती अगदी माझ्या पतीसारखीच दिसते. जेव्हा मी तिला पहिल्यांदा हातात घेतलं होतं तेव्हा गायत्री मंत्राचं पठण केलं होतं. त्यावेळी तिने डोळे उघडले आणि हसली. मी तो क्षण विसरू शकत नाही."
2015 मध्ये संगीता घोषचा गर्भपात झाला होता. त्याबद्दल बोलताना संगीता म्हणाली की, "मी सांगू शकत नाही की तो माझ्यासाठी किती भयंकर अनुभव होता. मला विश्वासच होत नव्हता, माझ्यासोबत असं कसं घडलं. कल्पना करा की तुम्ही तो जीव गमावता जो तुमच्या आत जगत असतो." मुलीच्या जन्मानंतर संगीता पुन्हा कामावर परतली होती आणि 'स्वर्ण घर'चं शूटिंग करत होती. सुरुवातीला मी थोडी गोंधळले होते पण पतीने सपोर्ट केल्याचं संगीताने सांगितलं.