दिग्दर्शक : अनुराग सिंग
निर्माते : धर्मा प्रोडक्शन, झी स्टुडिओज
कलाकार : अक्षय कुमार, परिणीती चोप्रा आणि इतर....
युद्धपट.... हा चित्रपटांचा असा विभाग किंवा प्रकार आहे, जो पाहताना थराराच्या अनुभवासोबतच आणखी एका एका भावनेने मन विषण्ण होतं. सैनिकांनी दिलेलं बलिदान आणि होणारी मनुष्यहानी या साऱ्याचं चित्रण या युद्धपटांमधून करण्यात येतं. असंच चित्रण अनुराग सिंग दिग्दर्शित केसरी या चित्रपटातून करण्यात आलं आहे. सारागढीच्या युद्धाचं प्रभावी चित्रण करत केसरीतून एक असा काळ आणि कथा साकारण्यात आली आहे, जी काळाच्या पडद्याआड अनेक वर्षे विस्मरणात गेली होती. मुळात ही एक काल्पनिक कथा नसल्यामुळे त्यावर दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बरीच मेहनत घ्यावी लागली असल्याचं प्रत्येक दृश्य पाहताना लक्षात येतं.
कलाकारांच्या वेशभूषेपासून त्यांच्या केशभूषेपर्यंत आणि एकंदरच त्यांच्या बोलण्याचालण्याच्या अंदाजापर्यंत दिग्दर्शकाने टीपलेले बारकावे 'केसरी'ला आणखी उठावदार करत आहेत. देशप्रेमाची भावना चित्रपटाच अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असून विविध दृश्यांतून ती कोणत्याही अतिशयोक्तीशिवाय दाखवण्याचा सुरेख प्रयत्न करण्यात आला आहे. त्याला जोड मिळाली आहे ती म्हणजे साहसदृश्यांची. कथानक, कलाकार, इतिहास आणि अर्थातच पार्श्वसंगीताची जोड मिळालेल्या या चित्रपटाता पूर्वार्ध हा काहीसा संथ वाटतो. अर्थात गतकाळातील शीख संस्कृती आणि राहणीमान यातून पाहता येतं. त्यामुळे हा संथपणा तितकासा सतावत नाही. उत्तरार्ध हा पूर्वार्धाच्या तुलनेत चांगला वेग पकडत असून, अदभूतपणे साकारलेल्या कलाकृतीची सांगता करुन जातो आणि वातावरण भावूक करुन जातो.
'केसरी'तील कलाकारांच्या अभिनयाविषयी सांगावं तर अक्षय कुमार त्याच्या वाट्याला आलेली भूमिका सुरेखपणे निभावून जातो. मुळात ती व्यक्तीरेखा ही त्याच्याशिवाय आणखी कोणाला साकारता आली असती का, असा प्रश्नही पडत नाही. त्याला साथ मिळत आहे ती म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिची. परिणीतीचा डीग्लॅम लूकही तितकाच प्रभावी ठरत आहे. मुख्य म्हणजे चित्रपटात असणारे सर्व सहायक कलाकार हे तुलनेने फार प्रसिद्धीझोतात नसले तरीही त्यांनी खिलाडी कुमारला दिलेली साथ ही प्रशंसनीय ठरत आहे. असा हा देशभक्तीचा आणि शौर्याचा गडद 'केसरी' एकदा पाहाच.
साडेतीन स्टार