Kesari song : प्रेमाची साद देतंय 'केसरी'तील 'वे माही' गाणं

 त्यांच्या प्रेमाचा प्रवास नेमका कसा सुरु होतो हेच या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे

Updated: Mar 21, 2019, 12:58 PM IST
Kesari song : प्रेमाची साद देतंय 'केसरी'तील 'वे माही' गाणं  title=

मुंबई : सारागढीच्या युद्धात २१ जवानांनी केलेल्या पराक्रमाची गाथा अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'केसरी' या चित्रपटातून साकारण्यात आली आहे. अशा या चित्रपटातीव वे माही हे आणखी एक गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यामधून प्रेम, आदर आणि गतकाळातील नात्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 

परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटातील भूमिकांमध्ये कशा प्रकारे ही प्रेमाची भावना खुलत जाते आणि त्यांच्या प्रेमाचा प्रवास नेमका कसा सुरु होतो हेच या गाण्याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. अरिजित सिंग आणि असिन कौर यांनी गायलेलं हे अस्सल पंजाबी गाणं तनिष्क बागची याने लिहिलं असून, त्यानेच ते संगीतबद्ध केलं आहे. 

अनोळखी व्यक्तींपासून सुरू झालेल्या प्रवास प्रेमाच्या बळावर लग्नाच्या नात्यापर्यंत कसा येऊन पोहोचतो याची एक सुरेल झलक वे माहीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. गाण्यातील परिणीती चोप्राचा लूक पाहता अनेक वर्षांपूर्वीच्या राहणीमानाचा अंदाज लावता येत आहे. तर, खिलाडी कुमार त्याच्या पगडीधारी लूकमध्ये तितकाच रुबाबदार दिसत आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित 'केसरी' या चित्रपटातील गाणी आणि कथानक प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.