मुंबई : मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे हा त्याच्या ठाम वक्तव्यांसाठी आणि भूमिकांसाठी ओळखला जातो. आस्तादनं कायमच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्याची मतं मांडली आहेत. आता म्हणे त्यानं एक अशी पोस्ट केली आहे ज्याचा संबंध थेट बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन हिच्याशी जोडलं जात आहे.
60 लाख रुपयांचं डिपॉझिट आणि 10 लाख रुपये दरमहा भाडं भरुन राहण्यापेक्षा घर विकत घेणं अधिक बरं, नाही का? असा उपरोधिक सूर असणारा प्रश्न त्यानं विचारला.
आस्तादची ही पोस्ट चर्चेत येताच अनेकांनीच त्याचा संबंध अभिनेत्री क्रिती सेनन हिच्याशी जोडण्यास सुरुवात केली.
क्रितीनं काही दिवसांपूर्वीच मुंबईतील अंधेरी इथे एक घर भाड्यानं घेतलं.
सूत्रांच्या माहितीनुसार तिनं या घराचं सेफ डिपॉझिट म्हणून 60 लाख रुपये भरले आहेत. तर, तिच्या या घराचं दरमहा भाडं 10 लाख रुपये इतकं आहे.
दरम्यान, आस्तादनं त्याच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव नमूद केलेलं नाही. पण, त्याची ही पोस्ट क्रितीलाच अनुसरून असल्याचाच सूर नेटकऱ्यांनी आळवला.
काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती, की बिग बी अमिताभ बच्चन यांनी अंधेरीतील त्यांचं ड्युप्लेक्स घर क्रितीला भाड्यानं दिलं. ज्यासाठी ती दर महिन्याला 10 लाख रुपये इतके पैसे मोजते.
सूत्रांच्या माहितीनुसार क्रितीचं हे नवं घर अंधेरीमध्ये लोखंडवाला रोड येथील अटलांटिस इमारतीमध्ये आहे. या घरासोबत 4 कार पार्किंगच्या जागाही आरक्षित आहेत.