Aamir Khan on Animal: अॅनिमल (Animal) चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (sandeep reddy vanga) पुन्हा एकदा चर्चेत आहे. चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्याने पुन्हा एकदा त्यावरील मतं मांडली जात आहेत. त्यातच संदीप रेड्डी वांगा टीका करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना उत्तर देत आहे. किरण रावच्या (Kiran Rao) टीकेला उत्तर देताना तिने आधी आमीर खानचे (Aamir Khan) चित्रपट पाहावेत असा सल्ला दिला होता. यानंतर आता आमीर खानने अॅनिमल, कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपटावर भाष्य केलं आहे.
'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत संदीप रेड्डीने किरण रावचा उल्लेख न करता तिला सुनावलं होतं. तिने आधी आपला पती आमीर खानचा 'दिल' चित्रपट पाहण्याचा सल्ला त्याने दिला. कशाप्रकारे आमीर खान अभिनेत्रीला बलात्काराची धमकी देतो आणि अखेरीस प्रेमात पडतो हे तिने सांगावं असं संदीप रेड्डी म्हणाला.
"मला त्या महिलेला सांगायचं आहे की, तिने आमीर खानला जाऊन विचारावं की, 'खंबे जैसे खडी है, लडकी है या फुलजडी है' हे काय होतं? त्यानंतर माझ्याकडे यावं. जर तुम्हाला 'दिल' चित्रपट आठवत असेल तर त्यात तिची चूक आहे हे दाखवण्यासाठी तो जवळपास बलात्कार करायला घेऊन जातो. यानंतर त्यांच्यात प्रेम होतं. हे नेमकं काय होतं? आपला सभोवताल पाहण्याआधी हे टीका का करतात ते समजत नाही," अशा शब्दांत त्याने सुनावलं होतं.
दरम्यान आमीर खान सध्या किरण रावने दिग्दर्शित केलेल्या आपल्या प्रोडक्शनचा 'लापता लेडीज'चं प्रमोशन करत असून यावेळी त्याने संदीप रेड्डीचे चित्रपट आणि हिंसक चित्रपट हिट होण्यावर भाष्य केलं आहे. न्यूज 18 च्या एका चर्चेदरम्यान आमीरला विचारण्यात आलं की, 'त्यांचा लापता लेडीज चित्रपट एक फेमिनिस्ट अँगल आहे. पण सध्या अॅनिमल-कबीर सिंगसारखे चित्रपट चालत आहेत. त्यात ज्या प्रकारची हिंसा आणि महिलांना ज्याप्रकारे दाखवण्यात आलं आहे त्यावरुन प्रेक्षक वेगळ्या दिशेला जात आहे असं वाटतं का?'
त्यावर उत्तर देताना आमीरने सांगितलं की, "प्रेक्षक प्रत्येक प्रकारचा चित्रपट पाहतात. तुम्हाला एखादा चित्रपट आवडला म्हणजे दुसरा आवडणार नाही असं नाही. प्रेक्षकांना प्रत्येक प्रकारचे चित्रपट आवडतात". संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटावर आमीर खान म्हणाला की, "ज्या चित्रपटांचं नाव तुम्ही घेतलं, ते मी पाहिलेले नाहीत. त्यामुळे मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही".
प्रेक्षकांच्या आवडीवर बोलताना आमीर म्हणाला की, "प्रेक्षक म्हणून कधी तुम्हाला कॉमेडी आवडते, तर कधी अॅक्शन आवडते. याच प्रेक्षकांना कधीतरी ड्रामाही आवडतो. प्रेक्षकांना चांगल्या गोष्टी आवडतात. त्यांना फरक पडत नाही. जर तुम्ही त्या पात्राशी जोडला गेलात, तर तुम्हाला चित्रपट आवडतो".
समाज आणि चित्रपटांचा प्रेक्षक बदलतोय का? असं विचारलं असता आमीरने उत्तर दिलं की, "मला समाज आणि प्रेक्षक नेहमी बदलत असल्याचं वाटतं. ते कधीच स्थिर नसतात आणि बदलत असतात. ही एक प्रक्रिया आहे. आपल्या प्रेक्षकांसह पुढे जावं लागतं आणि प्रेक्षकांना आपल्यासह पुढे जावं लागतं".
आमीर खानने लाल सिंह चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर अभिनयातून ब्रेक घेतला आहे. सध्या तो फक्त निर्माता म्हणून सक्रीय राहणार आहे. आमीरने आपला कोणताच नवा चित्रपट जाहीर केलेला नाही.