'त्यावेळी 1 लीटर पेट्रोल 8 रुपयाला मिळायचं आणि आज...', मराठी अभिनेत्याचे स्पष्ट वक्तव्य

त्यांनी मोटारसायकल चालवतानाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला आहे. 

Updated: Mar 10, 2024, 04:30 PM IST
'त्यावेळी 1 लीटर पेट्रोल 8 रुपयाला मिळायचं आणि आज...', मराठी अभिनेत्याचे स्पष्ट वक्तव्य title=

Milind Gawali On Petrol Price Hike : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीववरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका कायमच ट्वीस्टमुळे चर्चेत असते. या मालिकेतून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. याच मालिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. मिलिंद गवळी यांनी या मालिकेत अनिरुद्ध हे पात्र साकारले आहे. आता नुकतंच त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. 

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. ते नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील विविध घटनांवर भाष्य करताना दिसतात. आता मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर सायकल घेण्याचे स्वप्न या शीर्षकाखाली एक पोस्ट शेअर केली आहे. त्याबरोबरच त्यांनी मोटारसायकल चालवतानाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला आहे. 

मिलिंद गवळींनी सांगितला 'तो' किस्सा

"सायकल घेण्याचे स्वप्न” आपली स्वतःची एक सायकल असावी असं मला अगदी लहानपणापासून वाटायचं आणि मी मोठी सायकल चालवायला अगदी लहानपणीच शिकलो होतो, त्यावेळेला भाड्याने सायकल मिळायची, पाच पैसे दहा पैशाला अर्धा तास आणि आठाण्याला दोन तास, मला चांगलं आठवतं मी आईकडे नेहमी सायकल साठी हट्ट करायचो की “मला प्लिज सायकल घेऊन दे”, माझी आई मला म्हणायची की मी तुला आयुष्यात दोन गोष्टी कधीही घेऊन देणार नाही! पहिली गोष्ट म्हणजे “बंदूक” आणि दुसरी गोष्ट म्हणजे “सायकल”, तिला बिचारीला भीती होती की माझं पोरगं सायकल चालवत ट्रॅफिक मध्ये गेला आणि कुठे काही गाडीची धडक वगैरे लागली,  तर ही सायकलची हाऊस किती महाग पडेल काळजीपोटी बिचारी नाही म्हणायची, आणि मी ज्या दुसऱ्या गोष्टीचा हट्ट करायचं ती गोष्ट देण्याचा तर प्रश्न येतच.

पण हट्टी गाढव असल्यामुळे मी माझ्या दोन मावश्यांकडून त्यांच्याकडे पडलेल्या, कोणीही वापरत नसलेल्या सायकली घरी घेऊन आलो, आईला त्या गोष्टीचा वाईट वाटल होतं, पण आपल्या लाडक्या मुलाच्या हट्ट पुढे बिचारी काय बोलले नाही. पण ठेवायला असताना मी क्लासेसला चालत जायचं याचं तिला वाईट वाटलं म्हणून तिने मला मोटरसायकल मात्र घेऊन दिली साठवलेल्या पैशातून 17000 ची हिरो होंडा मोटरसायकल मला तिने गिफ्ट दिली, जी मी पडची आठ वर्ष वापरली, त्या मोटरसायकल ने मी अख्खी मुंबई पालथी घातली. एका लिटरला 60 किलोमीटर चालायची, आणि त्यावेळेला एक लिटर पेट्रोल ८ रुपयाला मिळायचं , ते नंतर १० रुपये झालं मग १२ रुपये झालं आणि आज 2024 ला १०७ रुपये पेट्रोल आहे ! आजही सायकल स्कूटर मोटरसायकल चालवायला मिळाली की तेवढाच एक्साईटेड आणि उत्साही असतो, आज पर्यंत सिरीयल मध्ये सिनेमांमध्ये खूप वेळा मोटरसायकल चालवायचा योग आला गाणी म्हणायचा योग आला, त्यावेळेला सुद्धा तो उत्साह काही कमी झाला नव्हता आणि आजही नाही आहे. 

आज सगळच आहे पण तिच्याकडे हक्काने हट्ट करू शकत होतो ती आई नाहीये, ज्यावेळेला रस्त्यावरून स्कूटर किंवा मोटरसायकलवर एखादा पोरगा जाताना दिसलं , की त्या पोराची आई घरी त्याची तो जोपर्यंत घरी सुखरूप परत येत नाही तोपर्यंत काळजी करत बसलेली त्याची आई माझ्या डोळ्यासमोर येते !" असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे. 

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने "खूप छान आठवण सांगितली , लहानपण आठवले" असे म्हटले आहे. तर एकाने "सर तुम्ही किती छान आणि मनापासून लिहिता", अशी कमेंट केली आहे. तसेच एकाने त्यांना "मार्च एंड सुरु आहे, जरा जपून... नाहीतर पावती मिळणार", असे म्हटले आहे.