'Period. End of Sentence'ची ऑस्करच्या शर्यतीत निवड

ग्रामीण भारतातील जीवनावर प्रकाशझोत टाकणारा माहितीपट 

Updated: Dec 18, 2018, 01:16 PM IST
 'Period. End of Sentence'ची ऑस्करच्या शर्यतीत निवड  title=

मुंबई : एखाद्या विषयाला हाताळत त्यावर आधारित एकादा माहितीपट किंवा चित्रपट साकारण्यासाठी कलाकारांमध्ये नेहमीच उत्साह आणि कुतूहलपूर्ण वातावरण पाहायला मिळतं. मुख्य म्हणजे कोणतीही कलाकृती साकराण्यासाठी त्यात कलाकार मंडळी जीव ओतून कामाला लागतात. अशा कलाकृतींची पोचपावती म्हणजे प्रेक्षकांची दाद आणि पुरस्कारांची मोहोर. त्यातही पुरस्कारांच्या या यादीत मानातच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्करशी एखादी कलाकृती जोडली गेली की, तिची शान काही औरच. 

'Period. End of Sentence', या माहितीपटाच्या वाट्याला सध्या असंच यश आलं आहे. मासिक पाळी, त्याविषयीचे समजस गैरसमज आणि ग्रामीण भारतामध्ये असणारे त्याविषयीचे न्यूनगंड या साऱ्याभोवती हा माहितीपट फिरतो. त्यासोबतच प्रकाशझोत टाकतो तो म्हणते भारताच्या 'पॅडमॅन' म्हणजेच अरुणाचलम मुरुगानंदन यांच्या कामावर.  अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या या लघुपटाची यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील  Documentary Short Subject category या विभागात निवड झाली आहे. 

गुनित मोंगा, मोंगा सिक्या एंटरटेंमेंट यांनी या माहितीपटाच्या निर्मितीत सहकार्य केलं असून, यापूर्वी 'द लंचबॉक्स' आणि 'मसान' या चित्रपटांच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग पाहायला मिळाला होता. 

रायका झेताबखी या अमेरिकन- इराणी वंशाच्या दिग्दर्शित ही कलाकृती लॉस एंजेलिसच्या ओकवूड स्कूल मधील विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षिका मेलिसा बर्टन यांच्या 'द पॅड' प्रोजेक्टपासून प्रेरणा घेत साकारण्यात आली आहे. 

२६ मिनिटांच्या या माहितीपटामध्ये उत्तर भारतातील हापूर या खेड्यातील  महिला आणि मुली कशा प्रकारे त्यांच्या गावात पॅड बनवण्याचं यंत्र सुरु करतात याची कहाणी दाखवण्यात आली आहे. 

भारताकडून ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी विदेशी भाषा या विभागात 'व्हिलेज रॉकस्टार्स' या चित्रपटाची निवड झाली आहे. २२ जानेवारी २०१९ ला ऑस्करची नामांकनं जाहीर करण्यात येणार आहेत. तर जवळपास एका महिन्याने म्हणजेच २४ फेब्रुवारीला हा दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.