मुंबई : एखाद्या लग्नसोहळ्याची निमंत्रण पत्रिका आल्यानंतरच त्या सोहळ्याला जाण्यास प्राधान्य दिलं जातं. तोपर्यंत कोणत्याही आमंत्रणाशिवाय अशा सोहळ्यांना हजेरी लावण्याची कल्पनाही केली जात नाही. पण, अभिनेता रणवीर सिंग मात्र या साऱ्याला अपवाद ठरत आहे. नेहमीच चौकटीबद्ध गोष्टींना शह देत वेगळ्या वाटेवर जाणाऱ्या रणवीरने पुन्हा त्याच्या याच स्वभावाची पुनरावृत्ती केली आहे.
मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात आगामी 'सिंबा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पोहोचला होता. त्याचवेळी त्या हॉटेलमध्ये एक लग्नसोहळा पार पडत असल्याची बाब त्याच्या कानावर पडली. बस्स....! लग्न असल्याचं कळताच रणवीरने त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.
विवाहस्थळी पोहोचत त्याने वधू-वराला आश्चर्याचा धक्काच दिला. लग्नसोहळ्यात व्यग्र असणाऱ्या पाहुण्या मंडळींनी रणवीरला पाहिलं अन्, त्यांनाही धक्काच बसला. 'हा इथे कसा....?', असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. तर, काहींच्या चेहऱ्यावर रणवीर येण्याचा आनंद स्पष्टपणे झळकत होता.
सोशल मीडियावर त्याच्या या नव्या करामतीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून, ते अनेकांनीच शेअरही केले आहेत. बी टाऊनच्या या अभिनेत्याचा अनोखा अंदाज पाहता जर तुम्हाला एखाद्या विवाहसोहळ्यात हा संग्राम भालेराव दिसला तर दचकू नका एवढंच सांगणं.
रणवीरने असं काहीतरी पहिल्याच वेळी केलं आहे असं नाही. यापूर्वीही तो अशा अनेक कारणांमुळे चर्चेत आला होता. सध्या तो रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी चर्चेचा विषय ठरत आहेत.