नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता या भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ९० हजार पदांसाठी प्रक्रिया करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे.
ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या पदांवर होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहीले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारिख ३१ मार्च आहे त्यामुळे तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
रेल्वेत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी ९० हजार पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी आपल्या ट्विट हँडलवरुन दिली आहे.
रेल्वे मंत्र्यांकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, ९ हजारांहून अधिक रिक्त आरपीएफ आणि आरपीएसएफ विभागातील पदांवर भरती करण्यात येणार आहे. आरपीएफ आणि आरपीएसएफसाठी अधिसूचना १९-२५ मे २०१८ च्या रोजगार वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात येईल. या संबंधी भारतीय रेल्वेकडून वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरपीएफमध्ये पुरुष आणि महिलांसाठी कॉन्स्टेबल आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी १०वी पास आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. महिलांसाठी मोठ्या प्रमाणात पदांचं आरक्षण करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ जून ते ३० जून या कालावधीत रेल्वे सुरक्षा दलासाठी अर्ज स्विकरण्यात येत आहेत.
काही दिवसांपूर्वी रेल्वेने ग्रुप सी आणि ग्रुप डी (असिस्टंट लोको पायलट्स, टेक्निशियन्स, गँगमन, स्विचमन, ट्रॅकमन, केबिनमन, वेल्डर्स, हेल्पर्स) या विविध ९० हजार पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे. आतापर्यंत या पदांसाठी जवळपास २ कोटी तरुणांनी अर्ज केले आहेत. सहायक लोको पायलट्स आणि टेक्निशियन्स या पदांसाठी ५० लाखांहून अधिक ऑनलाईन अर्ज करण्यात आले आहेत. रेल्वेतर्फे करण्यात येणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी भरती प्रक्रिया आहे.
रेल्वे भरती बोर्डाने ग्रुप डी साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ केली आहे. आता ही वयोमर्यादा वाढवून ३० करण्यात आली आहे. लेवल-१ पोस्टसाठी वयोमर्यादा २ वर्षांहून ३३ वर्षे करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, भरती परीक्षेसाठी ITI प्रमाणपत्राची अनिवार्यता संपवण्यात आली आहे.
आतापर्यंत रेल्वेची परीक्षा केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत होत होती मात्र, आता उमेदवार १५ भाषांमध्ये परीक्षा देऊ शकणार आहेत.