मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
यंदाची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच यंदापासून पहिल्यांदाच उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांच्या प्रत्येक पानावर बारकोड छापण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डातर्फे देण्यात आली.
मुंबई विभागातून तीन लाख ३० हजार ८२३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेपरफुटीचा प्रकार समोर आला होता. त्या पार्श्वभूमीवर पेपरफुटीच्या चौकशीसंदर्भात एक समितीही नेमण्यात आली. या समितीनेच पेपरफुटीसंदर्भात काही उपाययोजनांची शिफारस केली आहे.
यातील काही शिफारसी यंदाच्या परीक्षेपासून अंमलात आणल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिका अधिक व्यक्तींकडून हाताळल्या गेल्यास पेपर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळेच प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे केंद्रप्रमुखांच्या कक्षात न फोडता थेट वर्गात नेले जाणार आहेत.
तिथे दोन परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या साक्षीने पर्यवेक्षकाकडून हा गठ्ठा फोडण्यात येईल. त्यामुळे प्रश्नपत्रिका गोपनीय राहण्यास मदत होईल. तसेच २५ प्रश्नपत्रिकांचा एक संच करण्यात येणार आहे, यामुळे एका वर्गात २५ विद्यार्थीच बसवले जाणार आहेत.