दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागानं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेअंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्यानं विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांसाठी पुस्तक खरेदी करताना आपलं मोदी प्रेम दाखवून स्वामीनिष्ठा जपण्याचा प्रयत्न केलाय. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शालेय शिक्षण विभागानं महान व्यक्तींवरील पुस्तकांची खरेदी केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकांचा भरणा असल्यानं त्याबाबत आता नाराजीजा सूर उमटत आहे.
- नरेंद्र मोदींवरील ५९ लाख ४२ हजारांची पुस्तके खरेदी केलीत
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर २४ लाख २८ हजार
- महात्मा ज्योतिबा फुलेंवरील २२ लाख ६३ हजार
- तर महात्मा गांधीवरील पुस्तकांची किंमत आहे ३ लाख २५ हजार
- छत्रपती शिवाजी महाराजांवरील ३ लाख ४० हजार ९८२ पुस्तकं खरेदी करण्यात आलीयेत.
- तर एपीजे अब्दुल कलामांवर ३ लाख २१ हजार ३२८
- छत्रपती शाहू महाराजांवर १ लाख ९३ हजार ९७२
- नरेंद्र मोदींवर १ लाख ४९ हजार ९५४ पुस्तकं शिक्षण विभागानं खरेदी केली आहेत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर - ७९३८८
- महात्मा ज्योतिबा फुले - ७६७१३
- अटलबिहारी वाजपेयी - ७६७१३
- बाळ गंगाधर टिळक - ७५७७८
- साने गुरुजी - ७३७२६
- कर्मवीर भाऊराव पाटील - ७२९३३
- महात्मा गांधी - ९९६८
- इंदिरा गांधी - २६७२
- सावित्रीबाई फुले - १६३५
- जवाहरलाल नेहरू - १६३५
या आकडेवारीवर नजर टाकली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक यांच्यापेक्षा नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या जास्त असल्याचं लक्षात येतं. तर सर्वात जास्त खर्च हा मोदींवरील पुस्तकांसाठीच करण्यात आलाय. हा आकडे आहे ६० लाखांच्या घरात... या पुस्तक खरेदीबाबत शिक्षणमंत्री आणि सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केलीय... तर ही खरेदी पारदर्शक करण्यात आल्याचा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलाय.
यातून इतर महापुरुषांच्या तुलनेत मोदींची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचाही विरोधकांचा आरोप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या पुस्तकात तर मोदींच्या चहा विकल्यापासूनच्या ते आतापर्यंतच्या छायाचित्रांचाच समावेश आहे. तर चाचा चौधरी या प्रसिद्ध कॉमिक बुकच्या धर्तीवर 'चाचा चौधरी और नरेंद्र मोदी' हे पुस्तकही या यादीत अंतर्भूत आहे. ही सर्व पुस्तकं जिल्हा परिषदांच्या शाळेत अवांतर वाचणासाठी उपलब्ध करून दिली जाणार असून मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि किंमतीमुळे ही खरेदी वादात सापडली आहे.