दुबई : आयपीएल २०२० मध्ये चेन्नईचा खेळाडू ऋतुराज गायकवाज सध्या फॉर्मात आहे. आपल्या खेळीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. युवा खेळाडू ऋतुराजने सलग दुसरे अर्धशतक लगावले आहे. स्वत:वर विश्वास असल्याने चांगला खेळ करु शकल्याचे ऋतुराज सांगतो. कोलकाताने गुरुवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयममध्ये खेळल्या गेलेल्या मॅचदरम्यान चेन्नईसमोर १७३ धावांचे आव्हान होते. ऋतुराजने ५३ बॉल्समध्ये ६ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने ७२ रन्स केले आणि टीमला विजय मिळवून दिला. आपल्या या खेळासाठी ऋतुराजला 'मॅन ऑफ द मॅच'ने सन्मानित करण्यात आले.
मी दोन मॅचमध्ये अर्धशतक केले आणि त्यात आम्हाला विजय मिळाला याचा आनंद होत असल्याचे ऋतुराज म्हणाला. मला स्वत:वर विश्वास होता. मला जर खेळाची सुरुवात करण्याची संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेन हा विश्वास मला होता असेही तो पुढे म्हणाला.
कोरोना काळाने मला मजबूत बनवलंय. प्रत्येक स्थितीचा सामना हसत करायला हवा असे आमचे कॅप्टन (महेंद्रसिंग धोनी) सांगतात असेही गायकवाड म्हणाला. हे कठीण आहे पण मी प्रयत्न करतो. यामुळे मला वर्तमानात राहण्यास मदत मिळते असेही तो म्हणाला.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 49 व्या सामन्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नईचा संघ मैदानात उतरला आणि हरवलेला सूर पुन्हा शोधत संघानं सामना खिशात टाकत कोलकाताला नमवलं.
कोलकाता संघाचं आव्हान स्वीकारत माहीची ही सेना मैदानात आली. प्रथम फलंदाजी करत चेन्नईच्या संघापुढं कोलकाताच्या संघानं 173 धावांचं लक्ष्य ठेवलं. पहिल्या विकेटसाठी झालेल्या अर्धशतकी भागीदारीमध्ये पुण्याच्या ऋतुराज गायकवाडनं त्याची छाप सोडली.
एकिकडे संघ कोलमडत असतानाच ऋतुराज मात्र चांगलाच धीरानं विरोधी संघाचा सामना करत होता. अखेरच्या षटकापर्यंत रंगेल्या या सामन्यास रवींद्र जाडेजा, अर्थात सर जाडेजाची फटकेबाजीरी चांगलीच गाजली.
जाडेजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नसली तरीही, त्याची फलंदाजी तितकीच वाखाणण्याजोगी होती. कोलकाताच्या लॉकी फर्ग्सुसनच्या गोलंदाजीला फटकेबाजीनं उत्तर देत जाडेजानं सामन्याचं चित्र पालटलं. सामन्यावर चांगली पकड असतानाही खेळाडू बाद झाल्यामुळं चेन्नईच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या होत्या. पण, अखेर हे आयपीएल आहे... आणि इथं सामना रंगलाच नाही तर मग सारं व्यर्थच. अगदी याच ओळीला साजेसं चित्र सामन्याच अखेरच्या काही मिनिटांमध्ये पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे चेन्नईच्या विजयाचा मुंबईलाही फायदा झाला आहे. मुंबईच्या नावापुढं आता play off साठी, क्वालिफाय असे शब्द उमटल्यामुळं या विजयाचा आनंद मुंबईला पाठिंबा देणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.