BLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’?

तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..! 

Updated: Jan 2, 2018, 03:11 PM IST
BLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’? title=

रामराजे शिंदे, प्रिन्सिपल करस्पॉन्डंट,

झी मीडिया, नवी दिल्ली

तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..! 

तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. जयललिता यांची सावली म्हणून वावरणाऱ्या शशिकला यांची कारागृहात रवानगी झाली. करूणानिधी आजारी आहेत तर स्टॅलिन यांना राजकारणात अजून सूर सापडलेला नाही. कमल हसन हेसुद्धा चाचपडत पावले टाकत 'पार्ट टाईम' राजकारण करत आहेत. तमिळ राजकारणात जयललिता यांनी पर्याय उभा राहू दिला नाही. म्हणूनच रजनीकांत आणि कमल हसन यांना राजकारणात प्रवेश करता नाही. खंबीर नेतृत्व करुन जयललिता यांनी या बड्या अभिनेत्यांसाठी राजकारणाचे दरवाजे बंद केले होते. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. परंतू पिक्चर अभी बाकी है..!

चेहऱ्यामागचं रहस्य

तमिळनाडूच्या राजकारणात चेहऱ्याला जरा जास्तच महत्त्व आहे. इथलं राजकारण चेहऱ्याभोवती फिरताना दिसतं. करूणानिधी, एमजीआर, जयललिता हे बडे चेहरे... जयललिता यांच्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात दुसरा कोणता चेहरा दिसत नाही. करूणानिधी यांचा मुलगा स्टॅलिन हा राजकारणात अजून पाया पक्का करू शकला नाही. वडीलांच्या सावलीतच वावरत असल्यामुळे स्टॅलिनला मर्यादा येतात. लोकनेत्याची कमतरता तमिळ नागरिकांना जाणवतेय. अशा वेळी आणखी दोन चेहरे राजकारणात आले. कमल हसन आणि रजनीकांत... 

कमल हसन यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. जानेवारीपासून तमिळनाडूमध्ये दौरा काढणार असल्याचं जाहीर केलं. परंतु म्हणावा तेवढा वेग अद्याप आला नाही. आता रजनीकांतचा चेहरा समोर आल्यामुळे जनतेत आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. अभिनयात सर्वौच्च, वादापासून दूर, साधी राहणीमान, वैयक्तीक आणि सामाजिक जीवनात आदराचं स्थान असलेल्या रजनीकांतचा चेहरा मतं गोळा करण्यासाठी पुरेसा आहे. एमजीआर आणि जयललिता यांचा चेहरा लोकप्रिय होता. मात्र, तमिळनाडू हितासाठी त्यांनी तडजोड केली नाही. जयललिता या तर यूपीए आणि एनडीए सरकारमध्ये होत्या. परंतु त्यांनी तमिळनाडू जनतेच्या हितासाठी केंद्रासोबत संघर्ष केला. जलीकट्टू (बैलगाडी शर्यत) साठी जयललिता एवढ्या आग्रही होत्या की, मोदींवर वारंवार दबाव टाकला. केंद्र सरकारला अध्यादेश काढावा लागला. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं अध्यादेश रद्द केला, हा मुद्दा वेगळा. जयललिता यांनी केंद्रात असलेल्या सरकारला कधीच डोईजड होऊ दिले नाही. रजनीकांतला हेच करावं लागणार आहे. आपल्यापेक्षाही उत्तम अभियन करणारे राजकारणात सर्वोच्च पदावर विराजमान आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यांच्याशी खरा पंगा आहे. रजनीकांतचा चेहरा अन्य पक्षांचा मोहरा बनू नये. अन्यथा तमिळ जनता राजनीकांतचा चेहरा स्वीकारणार नाही.


करूणानिधी आणि एमजीआर 

आधार कुणाचा?

एमजीआर यांना तब्बल २० वर्षाचा राजकारणाचा अनुभव... जयललिता यांनाही राजकारणाचा अनुभव. रजनीकांत यांना मात्र राजकारणात कसलाही अनुभव नाही. एमजीआर यांना राजकीय वारसा करूणानिधी यांच्याकडून मिळाला. करूणानिधी आणि एमजीआर यांची चांगली मैत्री. करूणानिधी चित्रपटाची स्क्रीप्ट लिहून द्यायचे आणि एमजीआर अभिनय करायचे. पुढे मैत्रीखातर एमजीआर राजकारणात आले. एमजीआर यांनीही जयललिता यांना राजकारणात आणलं. एमजीआर यांनी पाच वर्षातच सत्ता आणली आणि मुख्यमंत्री बनले. परंतू ते त्यावेळी करूणानिधीसारखा गाडफादर होता, शिवाय एमजीआर डीएमकेचे सदस्य होते आणि आमदारही होते, हे विसरून चालणार नाही. त्यांच्यामागे डीएमकेची मोठी ताकद होती. राजकारणात यशस्वी होण्यासाठी ठेच लागावी लागते. १९७२ मध्ये एमजीआर यांना डीएमके मधून काढून टाकल्यानंतर त्यांनी जिद्दीने संघर्ष केला. तर जयललिता यांनाही तसाच अपमान पचवावा लागला. जयललिता यांना तर मारहाणही झाली. त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या उभारीला या कडव्या अनुभवांची साथ होती. त्यातूनच तावून सुलाखून दोन्ही अभिनेते पक्के नेते बनले. मात्र, रजनीकांत यांची राजकारणातील पाटी कोरी आहे. एमजीआर यांना डीएमकेचा तर जयललिता एआईडीएमके चा आधार होता, त्यामुळे राजकीय प्रवासात गाडी रूळावर राहीली. परंतू रजनीकांत यांना तसा आधार नाही. ज्या आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला, त्या शून्याचा आधार घेतच रजनीकांत यांना सुरूवात करावी लागणार आहे.


भाजपला पाठिंबा देणार?

तमिळ मातीत, भाजपची पेरणी

२०१४ लोकसभा निवडणूकीत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या भागात भाजपला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत या राज्यातून तेवढाच प्रतिसाद मिळेल का? यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांतील जागांची भरपाई दक्षिणेतून करावी, असा विचार भाजपनं केला आहे. केरळमध्ये भाजपने घातलेले लक्ष, केंद्रीय मंत्र्यांपासून ते राष्ट्रीय अध्यक्षांचे दौरे यावरून भाजपचा अजेंडा स्पष्ट दिसेल. त्याचा परिणाम केरळमध्ये भाजपचा टक्का वाढला. 

मात्र, तमिळनाडूमध्ये वेगळी परिस्थिती आहे. इथे राष्ट्रीय पक्षांना स्थान नाही. ६० वर्षापासून दक्षिणेत द्रविड चळवळ चालली. मागास समाजाभोवतीच तमिळनाडूचं राजकारण चालतं. तमिळनाडूच्या राजकारणात दोन पक्षांनी आपली मुळं खोलवर रोवली आहेत. एक म्हणजे डीएमके आणि दुसरा एआईडीएमके. या दोन्ही पक्षांनी ५० वर्षे द्रविड अस्मितेचं राजकारण केलं. द्रविड अस्मिता विसरून राजकारण करता येणार नाही. त्यामुळे तमिळनाडू मध्ये भाजपच्या विस्ताराला ब्रेक लागला. भाजपची विचारसरणी तमिळ मातीत रूजणारी नाही, हे भाजप नेतृत्वाला चांगलं ठाऊक आहे. त्यावर पर्याय म्हणून भाजपला तेथिल मातब्बर नेत्याची साथ घ्यावी लागत आहे. सध्या एआईडीएमके मध्ये फूट पडल्यामुळे भाजपच्या अपेक्षावर पाणी फेरले गेले. त्यामुळे रजनीकांतला पुढे करावं लागलं. रजनीकांतचं मन राजकारणाकडे वळवण्यासाठी भाजपनं भरपूर प्रयत्न केले. त्यात आता यश मिळाले. रजनीकांत पुढील निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन जनार्दन यांनी केले. हे वक्तव्य अतिशय सूचक आहे आणि तेवढंच रजनीकांत यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी घातकही आहे. रजनीकांतच्या मदतीनं भाजप तमिळनाडूमध्ये घुसखोरी करू शकेल. रजनीकांतला ताबडतोब जयललिता यांची कमतरता पूर्ण करता येणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या आर. के. नगर पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पडलेली मते ही नोटा पेक्षाही कमी होती. जयललिता यांच्या मृत्यू नंतरही एआईएडीएमकेची वोट बँक अजून मजबूत आहे, हे स्पष्ट झालं.


राजकारणाची 'एक्सपायरी डेट'

काय मांडून ठेवलंय?

रजनीकांत यांनी १९९६ मध्ये डीएमकेला पाठिंबा दिला होता. त्यावेळी डीएमके चांगल्या मतांनी आली आणि जयललिता यांचा निवडणुकीत पराभव झाला. परंतु त्यानंतर १९९८ च्या लोकसभेवेळी रजनीकांत यांनी डीएमकेला पाठिंबा दिला तरी डीएमकेचा पराभव झाला. २००४ मध्ये रजनीकांतने एआईडीएमके-भाजप युतीला मतदान करण्याचे आवाहन केले. परंतु त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे, त्यावेळी रजनीकांत प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर होता. तरीही त्यांच्या चाहत्यांनी निराशा केली. चाहते आणि मतदार यांच्यात फरक असतो, हे सिध्द झालं. रजनीकांत यांनी जात आणि धर्माला राजकारणापासून वेगळं ठेवणार असल्याचं जाहीर केलं. ते किती अमलात आणता येईल, हा प्रश्न आहे. भारतीय राजकारण जातीच्या आधारेच केलं जातं. ज्या मतदारसंघात ज्या जातीचं वर्चस्व आहे, तो उमेदवार दिला नाही तर मतं कशी मिळणार? चाहते मोठ्या संख्यने आहेत परंतु त्यांचं मतात रूपांतर होईलच असं नाही. तीन वर्षात जमलं नाही तर राजकारण सोडणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. राजकारण सुरू करण्यापूर्वीच 'एक्सपायरी डेट' सांगणं, हे मनातील संभ्रम दाखवतो आणि आत्मविश्वास कमी दर्शवितो.

झाकली मूठ सव्वा लाखाची, अशी म्हण आहे. रजनीकांत यांनी अद्याप अनेक मुद्दयावर आपलं मत व्यक्त केलं नाही. त्यांची मूठ बंद आहे. चित्रपटात काही क्षणांत पाण्याचा प्रश्न सोडविला, प्रत्यक्षात मात्र कावेरी पाण्याच्या मुद्द्यावर तोडगा कसं काढणार, याचं उत्तर शोधावं लागेल. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तमिळनाडूचा उलटा प्रवास सुरू आहे. त्याशिवाय बेरोजगारी, गरीबी, श्रीलंका तमिळ, शेतकरी, उद्योग आणि मच्छिमारांच्या समस्या गंभीर आहेत. रजनीकांत यांना आता या मुद्द्यांवर बोलावं लागेल... व्यक्त व्हावं लागेल... भूमिका घ्यावी लागेल... ती पटवून द्यावी लागेल... हे सगळं करताना अपमानास्पद वागणूक वाट्याला येईल तेही पचवावं लागेल. दोन घ्यावे लागतील आणि दोन देण्याची तयारीही ठेवावी लागेल. चित्रपटातील अभिनयाऐवढं तर राजकारण सोप्पं नाही. कारण, इथे रिटेक नसतो. एखादा चुकीचा शब्द राजकारण संपवून टाकतो. रजनीकांत यांनी चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन केल्यामुळे चाहत्यांसाठी तो देव बनला. एखादा भ्रष्टाचाराचा डाग बसला तर याच देवाला दगडं मारायला लोक मागेपुढे बघणार नाहीत. राजकारणात प्रवेश केल्यावर लोकांना वेळ द्यावा लागेल... त्यांची कामे करावी लागतील... त्यासाठी पैसा आणावा लागेल... पाण्यासारखा पैसा वाहवा लागेल... हे सगळं करताना सत्तरीकडे जाणारं वय शरीर थकल्याची आठवणही करून देईल. रजनीकांत यांनी नाटकात काम करताना दुर्योधन या निगेटिव्ह रोलपासून सुरूवात केली. दुर्योधनाचा अभियन चांगला गाजला. चित्रपटात पदार्पण केल्यावरही अनेक चित्रपटातून व्हिलनची भूमिका केली. त्यानंतर मेहनतीनं हिरोची भूमिका मिळवली. चित्रपटातला हिरो राजकारणात व्हिलन ठरू नये, याची काळजी घ्यावी लागेल. आज दुधाचा अभिषेक करणारे भक्त उद्या पुतळे जाळतील. हे सर्व सहन करण्याची मानसिक तयारी रजनीकांतला करावी लागणार आहे. रजनीकांत यांनी आपलं राजकारण कसं असेल याचं पोस्टर प्रसिद्ध केलं. ट्रेलर आणि त्यानंतर संपूर्ण चित्रपट बाकी आहे. रजनीकांत यांना नवीन वर्षात नवे राजकीय आव्हान स्विकारण्याची ताकद मिळो आणि तमिळ जनतेला त्यांचा ‘थलाईवा’मिळो, हीच सदिच्छा.