जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाच्या समारोप कार्यक्रमात, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी 'पुणेरी पगडी' घातली, यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "सभेची सुरूवात शहराच्या अध्यक्षा वंदनाताई आणि प्रिंपी-चिंचवडचे अध्यक्ष संजोग वाघेरे, यांनी माझं आणि छगन भुजबळ यांचं पुणेरी पगडी घालून स्वागत केलं. महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छीतो, येथून पुढे कधीही आम्हा लोकांचं स्वागत करायचं असेल, किंवा कुणाचंही स्वागत तुम्हाला करायचं असेल, तर कोणती पगडी त्या ठिकाणी द्यायची, हे मी आता आपल्याला सांगणार आहे, आणि, श्रीयुत छगन भुजबळ यांना मी पुढे यायला सांगतो, वंदनाताई आणि संजोग यांनाही सांगतो, जी पगडी मी त्यांच्या हातात देईन, तीच पगडी याच्यापुढे आपल्या सर्व कार्यक्रमात वापरली गेली पाहिजे."
यानंतर शरद पवारांनी नुकतेच भ्रष्टाचाराच्या आरोपातून, जामीनावर जेलमधून बाहेर आलेले, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना महात्मा ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. थोडक्यात पवारांनी पुणेरी पगडीची जागा, यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात महात्मा फुलेंच्या पगडीला दिली.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी मोलाचं कार्य केलं आहे. महात्मा फुले यांनी पुण्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महात्मा फुले यांची पगडी सन्मान म्हणून स्वीकारणे, गौरव म्हणून भेट देणे, यात मोठा सन्मान आहे, पण त्यासोबत जरतारच्या 'पुणेरी पगडी'चा पवारांना एवढा राग का? आणि तो इतक्या वर्षात नाही, पण आताच का आला? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे.
खरं तर १९७३ च्या घाशीराम कोतवाल या नाटकानंतर 'पुणेरी पगडी' अधिक प्रसिद्धला आली असं म्हणतात. पण त्याआधी, पुणेरी पगडी तशी काही लोकांना बौद्धिक मालमत्ता वाटते, हे देखील तितकंच खरं आहे. जी पगडी महाराष्ट्रातील न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर अशा लोकांनी वापरली, त्या 'पुणेरी पगडी'चा शरद पवारांना एवढा राग का येतोय, आणि तो देखील आताच का?
कारण शरद पवारांनी यापूर्वी देखील जाहीर कार्यक्रमात जरतारची 'पुणेरी पगडी' स्वीकारून सन्मान स्वीकारला आहे. ही बौद्धिक मालमत्ता म्हटली जाणारी ही पगडी, पवारांनी 'डोक्यावर घेतली'. मग 'पुणेरी पगडी' म्हटल्या जाणाऱ्या, या पगडीचा शरद पवारांना आताच का राग आला येतोय, हा प्रश्न राष्ट्रवादीसह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनाही पडतोय.
राष्ट्रवादी काँग्रेस मागील ४ वर्षापासून सत्तेपासून दूर आहे. या काळात पवारांच्या पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, छगन भुजबळांसारखे पवारांचे जवळचे सहकारी अडीच वर्षापासून तुरंगात होते, राष्ट्रवादीचे अनेक विश्वासू समजले जाणारे नेते, एका रात्रीत भाजपच्या तंबुत जावून बसले, यात सत्तेचा 'अर्थ' काहीही असला, तरी खऱ्या अर्थाने ४ वर्षात राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली.
राष्ट्रवादीची सुरूवात तशी जोमाने झाली होती, पंधरा वर्ष महाराष्ट्रातील तळागाळातल्या समाजाने, शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी डोक्यावर घेतली, त्यांनी सतत १५ वर्ष मतांची शक्ती राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या चावीला दिली. पण राष्ट्रवादीने घड्याळ्याच्या काट्यासारखं आपल्याला 'गोलमाल' फिरवल्याचं जनतेला वाटू लागलं. आणि ४ वर्षापूर्वी राष्ट्रवादीची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ताकत कमी झाली, तळागाळातला समाज आणि शेतकरी समाजाने राष्ट्रवादीकडे पाठ फिरवली, फार काही आशा नसतानाही, भाजप - शिवसेना पर्याय निवडला. राष्ट्रीय नेतृत्व समजले जाणारे पवार, आणि त्यांची ओळख शेतकऱ्यांचे नेते, आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अशी आहे. याच पवारांच्या पक्षाला सत्तेबाहेर गेल्यानंतर अवकळा आल्यासारखी परिस्थिती झाली.
संयमी आणि धुरंधर नेते अशी शरद पवारांची ओळख आहे, कला, क्रीडा, राजकारण अशा चौफेर विषयांवर शरद पवारांचा अभ्यास आहे, शरद पवारांच्या डोक्यात राग कुणाबद्दल आहे, हे कधीच जाहीर दिसून आलं नाही, पुण्याबद्दल तर कधीच नाही, पुण्यावर शरद पवारांचं प्रेम वेळोवेळी दिसून आलं आहे, पवारांनी अनेक समाजातील मित्र जोडल्याचं दिसून येचं, पण पवारांना अचानक पुणेरी पगडीचा राग का आलाय. हे मात्र न समजणारं कोडं निश्चित नाही, सत्ता दुरावण्याचा राग पवारांसारख्या मुसद्दी नेत्याने, 'पुणेरी पगडी'वर काढला, एवढंच काय ते आता, पुढील संकेत मिळेपर्यंत म्हणता येईल.