शिवसेनेचे ग्रह फिरले !

 भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शिवसेनेविरोधात 'एल्गार' पुकारला. 

Updated: Jul 7, 2017, 04:37 PM IST
शिवसेनेचे ग्रह फिरले ! title=

रामराजे शिंदे. प्रिन्सिपल करस्पॉन्डंट, झी मीडिया, नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शिवसेनेविरोधात 'एल्गार' पुकारला. 

वर्षानुवर्षे साथ देणा-या शिवसेनेविरोधात भाजपने का दंड थोपटले... शिवसेनेनं मित्रपक्षाचा विश्वास गमावला आहे का.. सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत नेमकं काय झालं... या बैठकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विशेषतः शिवसेनेच्या भवितव्यावर काय परिणाम होणार.. शिवसेना-भाजपमधील 'तू तू मैं मैं' वाढण्याचं कारण काय आहे.. खरंच शिवसेनेचे ग्रह फिरले आहेत का.. यासह असंख्य प्रश्नांचा घेतलेला आढावा...

 

राजकीय समीकरणं कशी बदलतात, याचं एक उत्तम उदाहरण... 

नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू होते. नितीन गडकरी अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले होते. त्यावेळी सर्वच पदाधिकारी, नेते आणि भाजपशासित राज्यांतील मंत्री, मुख्यमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर येऊन वाकून नमस्कार करत होते. त्या रांगेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही उभे होते. नरेंद्र मोदी नितीन गडकरी यांच्यासमोर आले आणि कमरेपासून वाकून नमस्कार करत म्हणाले, ‘’नितीनजी आप मेरे बडे भाई श्रीराम हो और मैं आपका छोटा भाई लक्ष्मण. मैं हमेशा आपके साथ रहकर सेवा करूंगा.’’

परंतू काय ग्रह फिरले, हे गडकरींनाही कळाले नाही. आता राजकीय परिस्थिती एवढी बदलली आहे की, नितीन गडकरीरूपी श्रीरामाला नरेंद्र मोदीरूपी लक्ष्मणाच्या आदेशांचे पालन करावे लागत आहे. या कलयुगात भगवान श्रीरामाला (नितीन गडकरी) लक्ष्मणाकडूनच (नरेंद्र मोदी) वनवास भोगावा लागत आहे. नरेंद्र मोदी लिखित रामायणात विरोधकांपेक्षा स्वकीयांचंच जास्त नुकसान झालं आहे.

हे लिहिण्याचं कारण काय तर, राजकारणात कोणाचीही वेळ कधीही बदलू शकते आणि कोणावरही कोणतीही वेळ येऊ शकते. दुसरं म्हणजे, जो योग्य टायमिंग साधतो त्याचीच वेळ चांगली असते. 'मौके पे चौका' मारणाराच सामना जिंकवून देतो आणि सामनावीर ठरतो. परंतू सध्या शिवसेना आणि भाजपचा चाललेला सामना वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. त्यात अमित शाह यांनी आणखी चुरस आणली आहे.

अमित शाह यांनी मागील आठवड्यातच मुंबईचा दौरा केला. भारतीय जनता पक्षानं २०१९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यासाठी मुंबईत बैठकही आयोजित करण्यात आली. ही बैठक अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली झाली. अमित शाह यांचा दौरा झंझावाती झाला. कारण, अमित शाह यांनी या दौ-यात मॅरेथॉन बैठका तर घेतल्याच परंतू आपल्या मंत्र्यांना, खासदारांना, आमदारांना आणि पदाधिका-यांना २०१९ मध्ये आपला शत्रू कोण आहे, याचे देखील स्पष्ट करून सांगितले. 

 

अमित शाहांच्या दाढीचं रहस्य

मुंबईत अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीची सुरूवात त्यांनी स्वतःच्या उदाहरणापासूनच केली. अमित शाहांना शाळेत असतानाही दाढी वाढविण्याचा खूप शौक. दाढी त्यांच्यासाठी खूपच प्रिय. त्यामुळे कोणत्याही किमतीवर दाढी काढणार नसल्याचा त्यांनी चंग बांधला होता. शाह एनसीसीचे विद्यार्थी होते. एनसीसी मध्ये सर्वांना नीटनीटके राहण्याची शिस्त लावली जात असे. दाढी ठेवायची नाही, हा त्या शिस्तीचाच एक भाग. परंतू दाढी काढली तर आपला चेहरा चांगला दिसणार नाही, याची अमित शाह यांना भीती. तसंच, ते कमी स्मितहास्य करत असल्यामुळे चेहरा सतत गंभीर दिसेल, ही भीतीही मनात होती. त्यामुळे त्यांनी दाढी करण्यास नकार दिला. एनसीसीच्या शिक्षकांनी शाहांना मैदानाचे दोन राऊंड मारायला लावले. दाढी काढली नसल्यामुळे प्रत्येक वेळी दोन राऊंड मारणं हा नित्यक्रम झाला. एकदा अमित शाहांना त्यांच्या गिल नावाच्या शिक्षकांनी सांगितले की, राऊंड मारताना तुला त्रास होतो, त्याचा परिणाम नकारात्मक होतो. त्यामुळे चिडचिड करत किंवा डोक्यावर खूप मोठं ओझं आहे, असं मानून राऊंड मारण्यापेक्षा हसत हसत राऊंड मार. यामुळे तुझ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. हा किस्सा सांगून अमित शाह यांनी उपस्थित सर्व मंत्री, पदाधिका-यांना सांगितले की, अशा प्रकारे तुम्हाला जर त्रास होत असेल तरी, हसत हसत कामाला लागा.

‘विस्तारका’वर मदार

अमित शाह यांनी गुजरातमध्ये सरकार का निवडून येतं, हेही उदाहरणासह सांगितलं. शाह म्हणाले, “गुजरात में ७० सीटें ऐसी है, जहां खंभा भी खडा करदो तो चुनके आएगा. क्योंकी विस्तारक नाम का नया पद निर्माण करके हमने वहां संघटन को मजबूती दी है.” तोच गुजरातचा फार्म्युला आता महाराष्ट्रातही लागू केला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाने ‘विस्तारक’ नावाचे पद सुरू केले आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक विधानसभेत २०-२५ विस्तारक असतील. हे विस्तारक म्हणजे पक्षाचे, आरएसएस किंवा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे विद्यार्थी असू शकतात. हे विस्तारक प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात जाऊन काम करतील. त्याच मतदारसंघात यांचं वास्तव्य असेल. घरदार सोडून हे विस्तारक कित्येक महिने पक्षाचे काम पाहतील. लोकसभा, विधानसभा मतदारंसघात कोणकोणत्या समस्या आहेत, त्यावर कोणता तोडगा असावा, लोकांना नेमकं काय हवंय, भाजप सरकारच्या योजना आणि निर्णय लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम विस्तारक करतील. थोडक्यात काय तर, भाजपचं संघटन आणि लोकांमधील दुवा म्हणून विस्तारक काम करणार. विस्तारकच खासदार आणि आमदारांचे रिपोर्टकार्ड ठरवतील. विस्तारकाच्याच सुचनेवरून खासदार, आमदार, नगरसेवकांचे तिकीटवाटप होईल. कोणता उमेदवार योग्य आणि कोणता अयोग्य हे ठरवण्याचे अधिकार विस्तारकाच्याच हाती जातील. विशेष म्हणजे हे विस्तारक थेट प्रदेशाध्यक्षांना अहवाल सादर करतील. आमदार किंवा खासदार या विस्तारकांना कोणतेही काम सांगू शकत नाहीत. हां, चहा-पाणी किंवा जेवणासाठी विस्तारकाला बोलवू मात्र शकतात. ते ही अदबीनं. म्हणजेच पक्षात आता विस्तारकाचं महत्त्व वाढणार. यापुढे खासदार, आमदार आणि नगरसेवक हे फक्त ‘रबर स्टॅम्प’ म्हणून राहतील. आमदार, खासदार यांचं प्राबल्य कमी करणं, हाच यामागचा उद्देश. विस्तारकांचे नेटवर्क शक्तीशाली झाले की, कोणत्याही व्यक्तीला तिकीट देऊन निवडून आणता येईल. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्या नेत्यांचं काहीच चालणार नाही. मतदारसंघात पकड नेत्यांची नको तर पक्षाची असावी, हा यामागचा उद्देश. इथे व्यक्तीला महत्त्व राहणार नाही, संघटना ताकदवान बनेल. म्हणूनच कोणताही खांब उभा केला तरी निवडून येऊ शकेल. हा या सर्वामागे ‘खांब’(ठाम) विचार! मात्र, या निर्णयामुळे भाजपच्याच काही नेत्यांमध्ये खदखद आहे. परंतू हा निर्णय स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
याच बैठकीत माधुरी मिसाळ यांनीही प्रश्न उपस्थित केला. सरकारतर्फे आता शिवार यात्रा सुरू करण्यात आली आहे. परंतू तिथे गेल्यावर लोक आम्हाला कामाबद्दल विचारणा करतात. आम्ही दिलेली लोकांची कामे होत नाहीत, असा संदेश जात आहे. त्यावर, शाह यांचे उत्तर हे असे होते... “तुम्ही लोकांच्या कोणत्याही विकासकामांची जबाबदारी घ्यायची नाही. तुम्ही फक्त मतदारसंघात लोकांना जाऊन नमस्कार करा, एवढीच तुमची जबाबदारी आहे. बाकी विकासकामाबद्दल सरकार आणि पक्ष बघेल.’’ म्हणजे खासदार, आमदारांनी आता फक्त लोकांच्या भेटी घ्यायच्या. यापलिकडे कोणतंही काम करायचं नाही. अमित शाह यांनी महाराष्ट्रातील मतदारसंघात लक्ष घातलं आहे. 

शिवसेनाच लक्ष्य

 


उद्धव ठाकरे 

शिवसेनेचे मताधिक्य असलेल्या मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. आपल्याला आपला पक्ष वाढविण्याची मुभा आहे, असं सांगून अमित शाह यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या मतदारसंघात घुसण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. शिवसेना हा आपला पहिल्या नंबरचा शत्रू आहे... अशी गर्जना अमित शाह यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे पदाधिका-यांच्या बैठकीत केली. २०१९ नंतर शिवसेना दिसणारही नाही, असा दावा अमित शाह यांनी केला. भाजपनं पक्ष वाढविण्याचा म्हणजे शिवसेनेचे महत्त्व कमी करण्याचा विडा उचलला आहे. त्याची तयारीही जोरात सुरू आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी अमित शाह पुन्हा मुंबईचा दौरा करणार आहेत. तीन दिवसांच्या या दौ-यात भाजपच्या आमदार, खासदारांचे रिपोर्टकार्ड तपासले जाणार आहे. परंतू शिवसेना कशी कमकुवत करता येईल, यावर पॉवर प्रेझेंटेशन होणार आहे. एकीकडे भाजपने संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असली तरी दुसरीकडे शिवसेना मात्र अनेक पातळीवर थंड असल्याचेच दिसून येते. अमित शाह मातोश्रीवर आले, यातच धन्यता मानणारी शिवसेना अमित शाह यांची व्यूहरचना पाहू शकली नाही. रात्रं-दिवस कष्ट करणा-याला फळ मिळतं, हे युपीच्या विधानसभा निवडणूकीतून दिसून आलं आहे. अमित शाह यांनी युपीत प्रत्येक पदाधिका-यांशी थेट संवाद साधला. भाजप कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढविला. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत शाहांनी १० दिवस मुक्काम ठोकला होता. आता अमित शाह यांनी समुद्र किना-यावरील राज्यांना भेटी देण्याचे काम सुरू केले. या तटयात्रेच्या माध्यमातून संघटन वाढवित आहेत. शिवसेनेसमोर अमित शाह सारख्या मेहनती व्यक्तीचं आव्हान आहे. शिवसेनेने चांगली तयारी केली नाही, तर ‘करून दाखविलं ऐवजी हारून दाखविलं…’ म्हणण्याची वेळ येईल.

शिवसेनेच्या टिकोजीरावाची धमकी

अमित शाहांची बैठक मुंबईत झाली होती परंतू ‘’शिवसेना भाजपचा पहिल्या नंबरचा शत्रू’’ ही बातमी मी दिल्लीतून दिली. त्यावर मला शिवसेनेचा पीआरओ हर्षद प्रधान यांचा फोन आला. दरडावलेल्या आवाजात त्यांनी मला म्हटलं, ‘’अरे तू बातमी कशी काय दिली?” आम्ही तुझ्याविरोधात बदनामीचा खटला भरू, अशी थेट धमकीच त्यांनी मला दिली. एवढंच नाही तर बातमी कोणी दिली असं विचारून माझ्या सोर्सची माहिती काढण्याचाही प्रयत्न केला. तुला कोणत्या पत्रकाराने बातमी दिली, अशी विचारणाही त्यांनी माझ्याकडे केली. आता ‘पीआर’गिरी पाहणा-या सन्माननीय प्रधानांना कोणीतरी सांगायला हवं की, अशा मोठ्या बातम्या पत्रकारांच्या सांगण्यावरून केल्या जातात का..? बेसिक नॉलेज नसलेल्या माणसाशी वाद घालूनही उपयोग नव्हता.
नावात हर्ष असला तरी तो वागण्यातही असावा आणि आडनावात प्रधान असल्यामुळे तुम्ही सर्वोत्तम झाला असा गैरसमज करून घ्यायला नको. प्रमुख होण्यासाठीचे काही गुण अंगी बाळगायला हवेत. आधीच शिवसेनेच्या नौकेला दहा भोकं पडली आहेत. एक भोक झाकायचं तर दुसरीकडून पाणी शिरतंय अशी परिस्थिती असताना त्यात असे टिकोजीराव मीडियावर दादागिरी करायला लागले तर शिवसेनेची नौका लवकरच तळाला जाईल, हे उद्धव ठाकरेंनीही लक्षात घ्यायला हवं. अशा लोकांमुळे शिवसेनेचं राजकीय वजनही घटत जाईल.

बंडसेना ते थंडसेना

शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध किती ताणले गेले आहेत, हे शिवसेनेचे नेते सरकारवर वारंवार करत असलेल्या हल्ल्यांमुळे लपलेले नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांना ऊबदार खुर्चीतून उठायला नकोसं वाटतं. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेने बासनात बांधून ठेवला आहे.
खिशात राजीनामा ठेवल्याचं म्हणणारे मंत्री तो देण्याची हिंमत करताना दिसत नाहीत. पावसाळ्यात राजीनामे भिजतील, असे विनोद सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळवत आहेत. तर बाहेर पडू म्हणणा-या शिवसेनेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान देण्याची मागणी नितेश राणे करतात. केंद्रातही शिवसेनेच्या वाघाचं मांजर झालं आहे. अनंत गीते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आहेत, परंतू त्यांना हा उद्योग जड जात असल्याचं दिसतंय. गीते यांच्या मंत्रालयासंदर्भातील अनेक निर्णय पीएमओ परस्पर घेते. गीतेंना चार-पाच महिन्यानंतर असा काहीतरी निर्णय घेतल्याचं कळतं. शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेत असूनही सकारात्मक कामगिरी करताना दिसत नाही. उलट वादग्रस्त वक्तव्य आणि सत्तेत राहून भाजपला शिव्या घालत असल्याने शिवसेनेचेची प्रतिमा मलिन होताना दिसते. सत्तेत रहायचं ‘तूप-रोटी’ खायची आणि मोदींना शिव्या घालायच्या, हा प्रकार सामान्य जनतेला आवडलेला दिसत नाही. लाचारी नको तर सन्मानाने लढू म्हणणारे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते पक्षनेतृत्वाच्या निर्णयावर नाराज आहेत. या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मात्र पक्षात दुय्यम दर्जाची वागणूक मिळते आहे. विद्रोह करणारी.. बंड करणारी, पेटून उठणारी शिवसेना आता 'थंडसेना' बनलीय.

अकाली दल आणि शिवसेना

 


प्रकाशसिंग बादल 

मोदी लिखित रामायणात शिवसेना पहिल्या नंबरचा शत्रू आहे. अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात तुलना केली तर मोदींचे प्रकाशसिंह बादल यांच्याशी चांगले संबंध आहे. प्रकाशसिंह बादल यांनी कधीही मोदींवर टिका केली नाही. बादल यांनी मोदींच्या पदाचा मान ठेवला. पंजाबमध्ये अकाली दलासोबत युती केली तर पानीपत होणार हे माहित असतानासुद्धा मोदींनी मैत्री तोडली नाही. पंजाबमध्ये बादलांसोबत जाऊन पराभवातले वाटेकरी बनले. परंतू अकाली दलाची साथ सोडून वेगळे लढले नाहीत. मोदींनी प्रकाशसिंह बादल यांना नेहमीच साथ दिली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही प्रस्तावक म्हणून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि प्रकाशसिंह बादल हेच होते. तर, रामनाथ कोविंद संसदेत राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरत असताना शिवसेना कुठेही दिसली नाही. शिवसेनेला साधं बोलावणंही पाठविलं गेलं नाही. एवढंच नव्हे, तर शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी सुचविलेल्या नावांना झुगारून देत शाह-मोदींनी आपल्याच उमेदवाराचं नाव घोषित केलं. राष्ट्रपती पदाचं नाव ठरवताना शिवसेनेला विचारलंही नाही. नाव निश्चित झाल्यानंतर सांगण्यात आलं. यावरून शिवसेना-भाजपमधील अंतर अधिकच वाढल्याचं दिसतं. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या अस्मितेमुळे राजकीय हवा आपल्या बाजूने असेल, असा विश्वास शिवसेनेला होता. परंतू जशी मराठी अस्मिता महाराष्ट्रात आहे, तशी अस्मिता पंजाबमध्ये दिसून येत नाही. दोन्ही राज्यांचे भौगोलिक आणि ऐतिहासिक संदर्भ वेगळे आहेत. त्यामुळे अकाली दलापेक्षा शिवसेना मोदींना आव्हान देऊ शकते, असा कयास लावला जात होता. मात्र, आता मराठी माणसाला पर्याय मिळालेला आहे. तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मराठी माणसाला आपल्याकडे वळवण्याचा भाजपने पुरेपूर प्रयत्न केला. यापूर्वी गुजराती म्हटलं की, मराठीजन दोन हात करण्यासाठी पेटून उठायचे. ती परिस्थिती बदलत चालली आहे. मोदींच्या प्रतिमेमुळे मराठी माणूस भाजपकडे आकर्षित होत आहे. शिवसेना, मनसे या मराठी माणसांच्या हितासाठी स्थापन झालेल्या संघटनांचे महत्त्वही कमी होत आहे. केवळ मुंबई काहीअंशी अपवाद असला तरी राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकांच्या निकालावरून हेच स्पष्ट होतं. शेवटी प्रत्येकाला आपआपला पक्षही वाढवायचा आहेच.

नियती कशी असते बघा... ,

अमित शाह यांच्यावर गुजरातमध्ये खटले चालले होते, काँग्रेसनं अमित शाह यांच्या मागावर पोलिस यंत्रणा लावल्या होत्या.. त्यावेळी केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने अमित शाह यांना मुंबईत आश्रय मिळाला होता. तेव्हा अमित शाह यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे नावाची ढाल पुढे होती. आता त्याच मुंबईत अमित शाह येऊन गेले. एकेकाळी भविष्यात आपलं काय होणार, याची शाश्वती नसलेले अमित शाह आता शिवसेनेचं भविष्यात काय करायचं, याबाबत शिवसेनेची कुंडली लिहितात. फरक एवढाच की, आता बाळासाहेब ठाकरे नाहीत. नाहीतर भाजपचे भवितव्य काय असेल, याची कुंडलीच बाळासाहेबांनी लिहिली असती. परंतू आता शिवसेनेचे ग्रह फिरले आहेत.
येणारा कालखंड शिवसेनेसाठी खडतर असणार आहे. काही नेत्यांच्या राशीत शनी आल्यामुळे विविध चौकशीच्या फे-या वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना मागची साडेसाती दूर करण्यासाठी शनीला शांत करावं लागणार आहे.
सच्चे नेते आणि कार्यकर्ते हाच शिवसेनेचा कणा आहे. हा कणा तुटला तर शिवसेनेला पुन्हा उभे राहता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेला यापुढे सन्मानानं लढावं लागणार आहे. बलाढ्य भाजपाशी दोन हात करावे लागणार आहेत... तेही 'कणा आणि बाणा' कायम राखत...