मुंबई : कोरोना महामारीमुळे ढासळलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेवर अजून एक संकट आल्याची बातमी समोर येतेय. गेल्या काही दिवसांपासून चीन कोरोनाशी झुंज देत आहे. संसर्ग रोखण्यासाठी, बीजिंग आणि शांघाय या दोन मोठ्या शहरांमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे एका गंभीर आजाराने ग्रासले आहे. शी जिनपिंग सेरेब्रल एन्युरिझम नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. एवढंच नाही तर 2021 च्या अखेरीस त्यांना रुग्णालयात दाखल सुद्धा करावं लागलं होतं, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे.
2019 ला त्यांनी केलेल्या इटली यात्रेदरम्यान ते समोर आले होते. तेव्हा जिनपिंग यांना चालायला त्रास जाणवत होता. त्यानंतर 2020 ला चीनमधील शेनझेनमध्ये झालेल्या रॅलीला जिनपिंग खुप उशीराने पोहोचले होते.
बीजिंग ऑलंपिकपर्यंत त्यांनी एकाही विदेशी नेत्याची भेट घेतली नसल्याने शी जिनपिंग यांच्या आरोग्यासंबंधी बातम्या यायला सुरु झाली. दरम्यान यावेळी त्यांनी कुठलीही सर्जरी न करता पारंपारिक चीनी औषधांद्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेरेब्रल एन्युरिझम हा मेंदूचा धोकादायक आजार आहे. हा आजार मेंदूच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. कोणत्याही वयाची व्यक्ती त्याला बळी पडू शकते. पण 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये याचे जास्त प्रमाण आढळून येते. या आजारामुळे स्ट्रोक, कोमा यांसारखी समस्या समोर येऊ शकते. तसंच जास्त प्रमाणात वाढ झाल्यास मृत्यूचा धोकाही उद्भवतो.