Penguins... पाहताक्षणी प्रेमात पडावं असा हा पक्षी. कार्टून म्हणू नका किंवा मग एखादं खेळणं, लहानपणापासूनच या पेंग्विनची ओळख आपल्याला झालेली असते. जगातील सर्वाधिक थंड प्रदेशात राहणाऱ्या या पेंग्विनप्रती अनेकांनाच कुतूहल वाटतं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. पण, हीच पक्षांची न उडता येणारी प्रजात सध्या धोक्यात आहे. पेंग्विनची कमी होणारी संख्या पाहता जगभरातून याबाबत जनजागृती आणि माहितीपर कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
25 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगात World Penguin Day म्हणून साजरा केला जातो. एका अनोख्या प्रजातीविषयी जाणून घेण्यासाठी या दिवसाहून खास क्षण नसावा. तुम्हाला माहितीये का पेंग्विन एक असा पक्षी आहे ज्याला पंख तर आहेत. पण तो उडू शकत नाही. असं का, माहितीये?
असं म्हणतात की, इतर पक्ष्यांप्रमाणं आधी पेंग्विनही उडू शकत होते. त्यांच्या शरीरात असणारी हाडं अतिशय हलकी होती. पण, कालांतरानं त्यांची हाडं दिवसागणिक टणक होत गेली, जड झाली आणि एक वेळ अशी आली जेव्हापासून त्यांना उडणं अशक्य होऊन बसलं.
दरवर्षीच्या प्रजनन काळात पेंग्विन स्वत:साठी एक जोडीदार शोधतात आणि हा काळ संपेपर्यंत ते जोडीदाराशी प्रामाणिक राहता. असं म्हणतात की मादी पेंग्विन सहसा एका प्रजनन काळात तीन पेंग्विनसोबत असते तर, नर किमान दोन माद्यांसह.
आकर्षक बाब म्हणजे, प्रजनन काळात नर पेंग्विन सुरेख आणि मऊसूत पृष्ट असणारा एखादा दगड शोधून तो मादी पेंग्विनला देतात. मादीला आकर्षित करण्यासाठी हा आटापिटा केलेला असतो. मादीला हा गारगोटा म्हणजेच दगज आवडला तर ती तिच्या घरट्यामध्ये तो ठेवते आणि नर- मादी मिळून दडग रचत पिलांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. नातं दृढ करण्यासाठी पेंग्विनचे हे प्रयत्न कमालच... नाही का?
पेंग्विनला उडता येत नसलं तरीही ही मंडळी भरपूर चालतात. प्रजनन काळात काही पेंग्विन 60 मैलांचाही प्रवास करतात. बऱ्याचदा खाण्याच्या शोधात पेंग्विन समुद्र, बर्फाळ प्रदेशातून दिवस- रात्र पायपीट करतात. पायांच्या नैसर्गिक आकारामुळं त्यांना अगदी सहजपणे पोहताही येतं. काय कमाल रचना आहे ना या पक्ष्याची? तुम्ही प्रत्यक्षात पेंग्विन पाहिलाय का, कमेंटमध्ये कळवा.