प्रियकराने सोडलं म्हणून तिने सुरु केली काळी जादू...; मात्र घडलेला प्रकार जाणून बसेल धक्का

Crime News : सोडून गेलेले प्रेम परत मिळवण्यासाठी या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आणि ती फसली. तिला तिचं प्रेम तर मिळालंच नाही पण तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला

Updated: Jan 4, 2023, 06:57 PM IST
प्रियकराने सोडलं म्हणून तिने सुरु केली काळी जादू...; मात्र घडलेला प्रकार जाणून बसेल धक्का title=

Viral News : आपलं प्रेम मिळवण्यासाठी सर्वच आपल्यापरीने प्रयत्न करत असतात. मात्र काहीवेळा काही प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार चीनमध्ये (China News) उघडकीस आलाय. प्रियकराच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणीने आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी अंधश्रद्धेचा (Black Magic) आधार घेतला. काळ्या जादूच्या माध्यमातून आपण आपलं प्रेम परत मिळवू असे या महिलेला वाटलं होतं. मात्र झालं भलतचं.

1.56 लाखांना घातला गंडा

या तरुणीला तिचा प्रियकर तर भेटलाच नाही मात्र तिला 13000 युआन म्हणजे सुमारे 1.56 लाख रुपयांचा फटका बसला आहे. फसवणूक झाल्याचे समजताच या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासानंतर  काळी जादू आणि ज्योतिषाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. प्रेमात फसवणूक झालेल्या किंवा प्रियकराला कोणत्याही किंमतीत परत मिळवायचे असेल अशा तरुणांना हे आरोपी टार्गेट करायचे. पोलीस तपासातून या आरोपींनी फसवणूकीतून 800,000 युआन म्हणजेच सुमारे 96 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

प्रियकराला परत मिळवण्यासाठी तरुणीचं टोकाचं पाऊल

माई नावाच्या तरुणीचा प्रियकर तिला सोडून दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला होता. यामुळे माई तणावात होती. माईला कोणत्याही परिस्थितीत आपलं प्रेम परत मिळवायचं होतं. याच दरम्यान तिने टिकटॉकवर ज्योतिषाचा एक व्हिडीओ पाहिला आणि इथूनच ती या फसवणूकीच्या जाळ्यात अडकली. सुरुवातीला स्वतःचे भविष्य जाणून घेण्यासाठी माईने 7 हजार रुपये दिले. यावेळी आरोपींनी तुझा प्रियकर लवकरच तुझ्या जवळ येईल पण त्यासाठी तुला काही काळ्या जादूशी संबंधित गोष्टींवर विश्वास ठेवावा लागेल आणि काही गोष्टी कराव्या लागतील असे माईला सांगितले. आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी माईने यावर विश्वास ठेवला.

काळ्या जादूच्या माध्यमातून पैसे उकळण्यास सुरुवात

त्यानंतर आरोपींनी हळूहळू काळ्या जादूच्या नावाखाली माईकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. माईला वेगवेगळ्या मंत्रांचा जप करायला सांगितला. व्हिडीओच्या माध्यमातून काळी जादू करत असल्याचे आरोपींनी माईला सांगितले. या जादूसाठी विविध वस्तू आणण्यासाठी त्यांनी माईकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे एकूण 1.56 लाख रुपयांचा गंडा या आरोपींनी माईला घातला.