नवी दिल्ली : ट्रेन, मेट्रोमध्ये जागेवरून होणारे वाद अगदी सामान्य आहेत. काही गंभीर वादांचे व्हिडीओ देखील अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु, हा प्रकार जरा वेगळाच आहे. यात भांडण नसून एका मुलाने बसायला जागा दिली नाही म्हणून ती महिला चक्क त्या मुलाच्या मांडीवर जाऊन बसली. हा सर्व प्रकार चीन मेट्रोमध्ये घडला आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चीनच्या नानजिंग शहरात हा प्रकार घडला. मेट्रोमध्ये एका तरुण मुलाने एका महिलेला आपली जागा देण्यास नकार दिला. यावर बराच वाद झाला. भांडण चालू असताना महिलेने सीटच्या मागे असलेल्या पोस्टरकडे बोट दाखवत काहीतरी सांगितले. परंतु, तो मुलगा काही जागचा हलायला तयार नाही.
त्यानंतर त्या महिलेने असे काही केले की सगळे बघतच राहिले. महिलेने आपली पर्स बाजूला ठेवली व त्या मुलाच्या मांडीवर बसली. त्यामुळे तो तरुण गोंधळला. याच मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला. त्याने शेयर करताच काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. युट्युब वर व्हिडीओ शेयर झाल्यानंतर त्यावर अनेक मिश्र प्रतिक्रिया उमटल्या.