दारु पिताना 'चिअर्स' न बोलता ओठांना मद्य न लावणे हे फोनवर संभाषण सुरू करण्यापूर्वी 'हॅलो' न बोलण्यासारखंच आहे. चिअर्स म्हणण्याची ही परंपरा शतकानुशतके सुरू आहे. त्यासाठी धार्मिक ते वैज्ञानिक असे अनेक दावे केले जातात. असे केल्यानंतर मद्याचे काही थेंब बाहेर पडतात, ज्यामुळे अतृप्त आत्म्यांना शांतता मिळते, असा दावा केला जातो. तुम्ही काही लोकांना पिण्यापूर्वी मद्याच्या ग्लासातून काही थेंब इकडे तिकडे शिंपडताना पाहिले असेल. तसेच चिअर्स करताना ग्लास एकमेकांवर आदळल्याने, त्या वातावरणातून वाईट आत्मे दूर होतात अशीही मान्यता आहे. (Why do people say cheers while drinking alcohol)
लोक 'चिअर्स' का म्हणतात?
कॉकटेल इंडिया यूट्यूब चॅनेलचे संस्थापक संजय घोष यांनी दारू पिण्यापूर्वी 'चीअर्स' करण्याच्या प्रक्रियेबद्दल एक अतिशय मनोरंजक गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, "दारु पिताना माणसे त्यांच्या पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करतात. जेव्हा लोक दारू पिण्यासाठी हातात ग्लास उचलतात तेव्हा ते प्रथम त्याला स्पर्श करतात. या दरम्यान, त्या पेयाकडे डोळ्यांनी पाहतात. पीत असताना त्या पेयाची चव जिभेने अनुभवतात. या दरम्यान त्या पेयाचा सुगंध नाकाने अनुभवातात."
घोष यांच्या मते, दारू पिण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत फक्त कानाचा वापर केला जात नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी, 'चिअर्स' करतो. अशा प्रकारे दारू पिण्यात पाच इंद्रियांचा पुरेपूर उपयोग होतो आणि दारू पिण्याची अनुभूती अधिक आनंददायी होते, असे म्हटलं जाते.
शॅम्पेनसचा आणि उत्सवाचा काय संबंध?
उत्सवाच्या प्रसंगी शॅम्पेन उडवताना अनेकांना आपण पाहिले असेल. याबाबतही घोष यांनी भाष्य केले आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर पहिल्यांदाच उत्सवाच्या निमित्ताने शॅम्पेनचा सार्वजनिकपणे वापर करण्यात आला. त्या काळी शॅम्पेन हे स्टेटस सिम्बॉल असायचे आणि ते विकत घेणे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे नव्हते. मात्र, आता ते खूपच स्वस्त झाले असून मध्यमवर्गीय लोकही ते सहज खरेदी करू शकतात. ज्यांच्यासाठी शॅम्पेन महाग आहे, ते उत्सवात स्वस्त पर्याय म्हणून 'स्पार्कलिंग वाईन' वापरतात.