मुंबई : ९ ऑगस्ट क्रांतीदिनी झालेल्या ऐतिहासीक मराठा मूक मोर्चाची महाराष्ट्रात नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा झाली. ही चर्चा सातासमुद्रापारही झाली. अमेरिकेतील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने या मोर्चाची दखल घेतली. वॉशिंग्टन पोस्टच्या संकेतस्थळावर छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध करण्यात आलेय.
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात आरक्षण द्यावे, यामागणीसाठी मुंबईत मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जोरदार प्रतिसाद मिळाला. मोर्चाचा शेवट आझाद मैदानात सभेत झाला. या मोर्चाची दखल मराठी, हिंदीसह इंग्रजी वाहिन्यांनी घेतली. तसेच मराठी, इंग्रजी, हिंदी आणि देशातील विविध भाषांमधील वृत्तपत्रांनीही घेतली.
मराठा मोर्चाची थेट अमेरिकेमधील सर्वाधिक खपाच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने दखल घेत. फोटोसह वृत्त छापलेय. पश्चिम भारतातील गरिब मराठा समाज शासकीय नोकरी आणि शिक्षणापासून वंचित आहे. त्यांना आरक्षण देण्यात यावे, यासाठी भगवे झेंडे घेऊन त्यांनी मोर्चा काढला. पाच किलोमीटरचा रस्ता संपूर्णपणे पॅक होता. मोठ्यासंख्यने मराठा समाज सहभागी होऊनही मोर्चा शांततेत होता, असे कौतुक वॉशिंग्टन पोस्टने केलेय.
महाराष्ट्रात १२३ दशलक्ष लोक आहेत. त्यापैकी ३५ टक्के एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज आहे, असेही या वृत्तात म्हटलेय. अहमदनगर जिल्ह्यात एका किशोरवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्याचा निषेध करण्यासाठी गतवर्षी मराठा संघटनेच्या एका गटाने या मोर्चाची स्थापना केली. त्यानंतर अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा पुढे सुरु राहिला, असेही नमुद करण्यात आलेय.