Turkey Earthquake: पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखाली सापडला भारतीय व्यक्तीचा मृतदेह

Uttarakhand Man Body Found Under Rubble In Turkey: या व्यक्तीचा मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला तुर्कीमधील भारतीय दुतावासाने दुजोरा दिला आहे. एका हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली या व्यक्तीचा मृतदेह सापडला.

Updated: Feb 11, 2023, 08:03 PM IST
Turkey Earthquake: पाच दिवसांनंतर ढिगाऱ्याखाली सापडला भारतीय व्यक्तीचा मृतदेह title=
Uttarakhand Man Body Found Under Rubble In Turkey

Uttarakhand Man Body Found Under Rubble In Turkey: तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये (Turkey Earthquake) मरण पावलेल्यांची संख्या आज 24 हजारांच्या पुढे गेली आहे. मरण पावलेल्यांमध्ये एका भारतीयाचाही समावेश असून आज या व्यक्तीचा मृतदेह बचाव पथकाला सापडला. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कीमध्ये आलेल्या भीषण भूकंपानंतर बेपत्ता झालेल्या भारतीयाचा मृतदेह पाच दिवसांनंतर सापडला आहे. तुर्कीमधील भारतीय दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीचा मृतदेह माल्तया येथील एका हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली सापडला आहे.

कोण आहे ही व्यक्ती?

मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव विजय कुमार असं आहे. विजय हे मूळचे उत्तराखंडमधील रहिवाशी आहेत. विजय हे एका व्यवसायिक दौऱ्यासाठी तुर्कीला आले होते असं दुतावासाने म्हटलं आहे. विजय यांचा मृतदेह भारतामध्ये परत आणण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदोपत्री तयारी आणि व्यवस्था करण्यात आली आहेत, असं भारतीय दुतावासाने म्हटलं आहे.

40 हजार जणांचे मदतकार्य

सोमवारी तुर्की आणि सीरियाच्या सीमारेषेजवळील भाग 7.8 रिस्टर स्केअल क्षमतेचा भूकंपाने हादरला. या भूकंपामुळे हजारो इमारती कोलमडून पडल्या. या भूकंपामुळे आर्थिक नुकसानीबरोबरच मोठ्या प्रमाणात जिवीतहानीही झाली आहे. तुर्कीमधील सरकारी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशातील 32 हजार कर्मचारी पडलेल्या इमारतींचे ढिगारे उपसण्याचं काम करत आहेत. या ढिगाऱ्यांखालून मृतदेह आढळून येत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय भारत, अमेरिका, चीनसारख्या देशांमधील 8 हजारांहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेली पथकंही येथे मदतकार्यासाठी कार्यरत आहेत. 

राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली खंत

सध्या तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडली असून अशा परिस्थितीमध्येही मदतकार्य सुरु आहे. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी शुक्रवारी या भूकंपासंदर्भात भाष्य करताना सरकारी यंत्रणांनी जितक्या तातडीने भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी पोहचणं अपेक्षित होतं तितक्या लवकरच आम्ही पोहचू शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. 

1939 च्या भूकंपाची झाली आठवण

तुर्कीमध्ये सोमवारी आलेला भूकंप हा 1939 च्या भूकंपाची आठवण करुन देणारा आहे. या भूंकपामध्येही 33 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.