अंगठ्याचं नख 4 फूट लांब तर करंगळीचे.., 25 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे महिलेने रचला विश्वविक्रम

 डायना आर्मस्ट्राँग नावाच्या अमेरिकन महिलेने सर्वात लांब नखे असण्याचा विक्रम केला आहे

Updated: Aug 6, 2022, 07:52 PM IST
अंगठ्याचं नख 4 फूट लांब तर करंगळीचे.., 25 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे महिलेने रचला विश्वविक्रम title=
(फोटो सौजन्य - @GWR)

Diana Armstrong : अमेरिकेतील एका महिलेने केलेल्या विक्रमामुळे सध्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आहे. डायना आर्मस्ट्राँग नावाच्या अमेरिकन महिलेने सर्वात लांब नखे असण्याचा विक्रम केला आहे. डायना आर्मस्ट्राँग यांनी जगातील सर्वात लांब नखे असलेल्या महिलेचा जागतिक विक्रम मोडला आहे.  मंगळवारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ही घोषणा केली. 

अमेरिकेतील मिनेसोटा येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय डायना यांनी दोन्ही हातांना सर्वात लांब नखे असलेल्या महिलेचा विक्रमही आपल्या नावावर केल्याचे गिनीज रेकॉर्डने म्हटले आहे. डायना यांच्या दोन्ही हातांच्या नखांची लांबी 42 फूट झाली आहे जी शाळेच्या बसइतकी आहे. डायना गेल्या 25 वर्षांपासून आपली नखे वाढवत आहेत.

गिनीज रेकॉर्ड्सनुसार, डायना आर्मस्ट्राँग नावाच्या महिलेची नखे जवळ  42 फूट 10.4 इंच आहेत. तर उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाची लांबी 4 फूट 6.7 इंच आहे. तर त्याच्या डाव्या हाताच्या सर्वात लहान बोटाच्या नखाची लांबी ३ फूट ७ इंच आहे. 

डायना आर्मस्ट्राँग यांनी 1997 मध्ये शेवटची नखे कापली होती. अपघातानंतर त्यांनी नखे कापणे बंद केले. डायना यांची 16 वर्षांची मुलगी लतिशाचा झोपेत असताना दम्याने मृत्यू झाला होता.

आर्मस्ट्राँग म्हणाल्या की, माझी मुलगी दर आठवड्याला माझी नखे कापायची. ती माझ्या नखांवर पॉलिश लावून फाइल करायची. त्यानंतर मुलांनी अनेक वेळा नखे ​​कापण्यास सांगितले पण मी नकार दिला. मुलीच्या आठवणीमध्ये डायना यांनी २५ वर्षे नखे कापली नाहीत.

लांब नखांमुळे डायना यांना आपल्या आयुष्यात बदल करावे लागले. त्यांनी ड्रायव्हिंग सोडले, त्या खिडकीबाहेर हात ठेवत नाही आणि त्या आता सलूनमध्येही जात नाही. डायना यांच्या आधी ज्या महिलेच्या नावे हा विक्रम होता त्याची लांबी 18 फुटांपेक्षा जास्त होती.