आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही नंतर अमेरिकेची 'स्पेस फोर्स' प्रत्यक्षात

अमेरिकेचे जगामध्ये उलथापालथ घडवणारे निर्णय 

Updated: Dec 21, 2019, 08:20 PM IST
आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही नंतर अमेरिकेची 'स्पेस फोर्स' प्रत्यक्षात title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी जगामध्ये उलथापालथ घडवणारे दोन निर्णय अंमलात आणले. संरक्षण दलासाठी तब्बल ७३८ अब्ज डॉलर्स मंजूर करणाऱ्या करारावर स्वाक्षरी करतानाच अमेरिकेच्या 'स्पेस फोर्स'चंही उद्घाटन केलं. आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही याच्या जोडीला लष्काराची ही चौथी तुकडी अस्तित्वात आली आहे. सगळ्या जगावर राज्य करणाऱ्या अमेरिकेला आता अंतराळातही आपली सत्ता मजबुत करायची आहे. त्यासाठी ही तुकडी अन्य तीन्ही दलांच्या समकक्ष असणार आहे. जनरल जे रेमंड हे या स्पेस फोर्सचे पहिले प्रमुख असतील. 

युद्धाची व्याख्या बदलणार?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही घोषणा केली तेव्हा त्यावर टीका झाली होती. चीन, रशियापासून अनेक देशांनी स्पेस फोर्स तयार करण्यावर आक्षेप घेतला होता. मात्र या विरोधाला काहीएक भीक न घालता ट्रम्प यांनी स्पेस फोर्स प्रत्यक्षात आणला आहे. आता अमेरिकेला उत्तर देण्यासाठी जगातल्या सर्वच महासत्ता आपापली अंतराळ दळं अस्तित्वात आणू शकतात. एक नव्या 'स्पेस वॉर'ला ट्रम्प यांनी जन्म दिला आहे.

16 हजार सैनिक

अमेरिकेचे 16 हजार सैनिक या मध्ये असणार आहेत. जे फक्त अंतराळातील संकटाशी लढतील. ट्रम्प यांनी म्हटलं की, अंतराळात बरंच काही होणार आहे. ताकण आता जगातील नवीन युद्धभूमी तयार होत आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आमची श्रेष्ठता महत्त्वाची आहे. आम्ही खूप पुढे आहोत. पण रशिया आणि चीनला उत्तर देण्यासाठी आम्हाला प्रत्येक क्षेत्रावर नियंत्रण मिळवावं लागेल.
 
चीन आणि रशियाने अंतराळात गुप्तता पाळण्यासाठी आणि सैन्याचं परीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलं आहे. दोन्ही देश सायबरस्पेस क्षमता विकसित करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्याकडे अँटी-सॅटेलाइट मिसाईल शिवाय लेझरनेहल्ला करण्याची क्षमता आहे. अमेरिकेकडे सध्या शेकडो सैन्य सॅटेलाईट आहे. पण याच्या सुरक्षेसाठी त्यांच्याकडे यंत्रणा नाही. असं अमेरिकेने एका अहवालात म्हटलं होतं.

ईरान आणि उत्तर कोरिया देखील हळूहळू अंतराळात पोहोचत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आव्हानं वाढणार आहेत. याला तोंड देण्यासाठी आपली ताकद वाढवण्य़ाची गरज आहे. असं देखील या अहवालात म्हटलं होतं.