उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राचे कठोर निर्बंध

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर आतापर्यंत सर्वात कठोर निर्बंध लागू करण्याच्या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी दिलीय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 12, 2017, 04:36 PM IST
उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राचे कठोर निर्बंध title=

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर आतापर्यंत सर्वात कठोर निर्बंध लागू करण्याच्या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी दिलीय. 

अमेरिकेनं यासंदर्भातला प्रस्ताव आठ दिवसांपूर्वी सादर केला. त्यावर चर्चा केल्यावर सुरक्षा परिषदेच्या सर्व १५ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं.. सुरक्षा परिषदेच्या ठराव क्रमांक २३७५ नुसार यापुढे उत्तर कोरियाला जगातून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा जवळपास बंद होणार आहे. 

सध्याच्या निर्बंधानुसार उत्तर कोरियाला अत्यावश्यक सेवांपुरता कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येतो. आता त्यातही ३० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे.  उत्तर कोरियाला मिळाणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा तर पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.  

उत्तर कोरियातून होणाऱ्या निर्यातीवरही अभूतपूर्व निर्बंध घालण्यात आलेत. जगातली एकही राष्ट्र यापुढे उत्तर कोरियात तयार झालेला कपडा विकत घेणार नाही. त्यामुळे कपडा निर्यातीवर पूर्ण बंदी असेल. यामुळे उत्तर कोरियाला सातशे साठ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसणार आहे. 

याशिवाय कुठल्या राष्ट्राशी संयुक्त विद्यमानं सुरू असलेले सर्व प्रकल्प तात्काळ थांबवण्याचेही निर्देशही या प्रस्तावाद्वारे सर्व सदस्य देशांना देण्यात आले आहेत.