युक्रेन-रशिया युद्धादरम्यान या देशावर पडली मिसाईल, आता दोन्ही देशांनी झटकले हात

Ukraine-Russia war : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अजून तरी थांबलेलं नाही. पण या दोन्ही देशांच्या वादात तिसऱ्या देशातील लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Updated: Nov 17, 2022, 07:17 PM IST
युक्रेन-रशिया युद्धादरम्यान या देशावर पडली मिसाईल, आता दोन्ही देशांनी झटकले हात title=

मुंबई : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध (Ukraine-Russia war) अजून सुरुच आहे. रशिया युक्रेनवर सतत हवाई हल्ले करत आहे. तर युक्रेन देखील माघार घ्यायला तयार नाही. युक्रेनकडून देखील उत्तर दिलं जात आहे. पण आता या दोन्ही देशाच्या वादात तिसऱ्या देशावर मिसाईल कोसळली आहे. ही मिसाईल युक्रेनच्या हवाई दलाने डागल्याचे रशियाचे म्हणणे आहे. पोलंडने बुधवारी दावा केला की, रशियन बनावटीचे एक क्षेपणास्त्र आपल्या सीमेच्या 6 किलोमीटरच्या आत पडले. ज्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिसाईल पडल्यानंतर तणाव वाढला होता. कारण पोलंड हा नाटो या लष्करी संघटनेचा सदस्य आहे. पण आता अमेरिका, युक्रेन, पोलंड आणि नाटोच्या वेगवेगळ्या विधानांमुळे सस्पेन्स वाढला आहे.

पोलंड काय म्हणाला?

पोलंड (Poland) आणि नाटोने (NATO) बुधवारी एक निवेदन जारी करून म्हटले की, पडलेले क्षेपणास्त्र हे युक्रेनच्या हवाई संरक्षणातील मिसाईल असू शकते. नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग म्हणाले की, ही युक्रेनची चूक नाही. शेवटी रशिया याला जबाबदार आहे कारण तो अजूनही युक्रेनविरुद्ध बेकायदेशीर युद्ध पुकारत आहे. हे क्षेपणास्त्र युक्रेनच्या एअर डिफेन्समधून आले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे डुडा यांनी सांगितले की, पडलेले क्षेपणास्त्र हे सोव्हिएत युनियनमध्ये बनवलेले S-300 आहे. हे खूप जुने क्षेपणास्त्र असून ते रशियाकडून डागल्याचा कोणताही पुरावा नाही. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून युक्रेनच्या हवाई संरक्षणाने हे केले असावे, असेही त्यांनी सांगितले.

पोलंडवर क्षेपणास्त्रे सोडल्याचा आरोप युक्रेनने रशियावर केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा रशियावर टीका केलीये. झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही याआधीही म्हटले आहे की, रशियाचा दहशतवाद आमच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही. रशिाचा सगळ्यांना धोका आहे. हे थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

अमेरिका काय म्हणाली?

पोलंड, नाटो आणि अमेरिकेचे म्हणणे आहे की युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेने रशियन क्षेपणास्त्राला लक्ष्य केले असावे आणि ते पोलंडमध्ये पडले.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनीही हे क्षेपणास्त्र रशियाकडून आले नसण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी पोलंडच्या तपासाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. पोलंडवरील हल्ल्यानंतर बायडेन यांनी लगेचच G-7 आणि NATO ची बैठक बोलावली. ज्या वेळी क्षेपणास्त्र पोलंडवर पडले, त्या वेळी इंडोनेशियातील बाली येथे G-20 शिखर परिषद सुरू होती. हॉटेलमध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अमेरिकेशिवाय कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली, जपान, ब्रिटन, युरोपियन युनियन, स्पेन आणि नेदरलँड या देशांचे प्रमुख उपस्थित होते.

रशियाने या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. पोलंडवर पडलेले क्षेपणास्त्र युक्रेनकडून डागण्यात आल्याचेही रशियाने म्हटले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून युक्रेनचे आरोप फेटाळून लावले आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाने युद्धाला आणखी चिथावणी देण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा हल्ला असल्याचे म्हटले आहे.

1991 पर्यंत युक्रेन हा सोव्हिएत युनियनचा भाग होता. डिसेंबर 1991 मध्ये सोव्हिएत युनियन तुटल्यानंतर युक्रेन हा वेगळा देश बनला. विभक्त झाल्यानंतर सोव्हिएत युनियनमध्ये बनवलेली अनेक शस्त्रेही युक्रेनकडे गेली. त्यामुळे युक्रेनकडे अजूनही S-300 क्षेपणास्त्रांसह अनेक सोव्हिएत आणि रशियन बनावटीची शस्त्रे आहेत.

रशियन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने क्षेपणास्त्र डागले असावे आणि ते चुकून पोलंडमध्ये पडले असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.