हेग : Russia Ukraine War : रशियाचे हल्ले ताबडतोब थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली आहे. युक्रेनने रशियाच्या आक्रमणाविरोधात हेग येथील संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात धाव घेतली आहे. (Ukraine has called on the International Court of Justice to intervene immediately to stop Russia's attacks) न्यायालयाचे अध्यक्ष असलेले अमेरिकन न्यायाधीश जोआन डोनोग यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी नेदरलँड्सच्या रशियन राजदुतांनी आपल्या देशाला तोंडी सुनावणीमध्ये रस नसल्याचे न्यायालयाला कळवले आहे. त्यामुळे रशियाच्या अनुपस्थितीत खटल्याचे दोन दिवसांचे कामकाज सुरू झाले होते.
यूक्रेनमधल्या विनिस्तिया एयरपोर्टवर रशियाने काल हल्ला केला. रशियाने 8 रॉकेटसच्या मदतीने विनिस्तिया एअरपोर्टला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर एअरपोर्टवर मोठी आग भडकली. त्यामध्ये संपूर्ण एअरपोर्ट जळून खाक झाला. त्यानंतर युक्रेनची अतिमहत्त्वाची ठिकाणे रशिया जाणूनबुजून नष्ट करतेय, असा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.
दरम्यान, नाटोने युद्धात प्रत्यक्ष उतरण्यास नकार दिला असला तरी युक्रेनला शस्त्र पुरवठा मात्र केला जातोय. गेल्या एका आठवड्यात युक्रेनला नाटो आणि अमेरिकेकडून जवळपास 17 हजार अँटी टँक शस्त्र पुरवण्यात आली आहेत. असा दावा न्युयॉर्क टाईम्सने केला आहे.
तर दुसरीकडे रशियानेही काही अटी घातल्या आहेत. संपूर्ण शरणागती पत्करा तरच युद्ध थांबेल, असा इशारा रशियाने युक्रेनला दिला आहे. रशिया युक्रेन शांतीचर्चेत रशियाने तीन अटी ठेवल्या आहेत. या तीन अटी मान्य झाल्या तरच युक्रेनवरचा भडीमार थांबेल. पण युक्रेन सध्या तरी युद्ध थांबवण्याच्या मूडमध्ये नाही. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय न्यायालय काय निर्णय घेणार याचीच उत्सुकता लागली आहे.