Ukraine Disrespect Goddess Kali: युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने (Ukraine defence ministry)शेअर केलेल्या एका फोटोमुळे भारतीय चांगलेच संतापले आहेत. संरक्षण मंत्रालयाने ट्विटरला पोस्ट केलेल्या फोटोत कालीमातेचा (Goddess Kali) अपमान करण्यात आला आहे. या फोटोत स्फोटाच्या धुरावर कालीमातेची प्रतिमा आक्षेपार्ह स्थितीत दर्शवण्यात आली होती. तसंच 'Work of Art' अशी कॅप्शन देण्यात आली होती. यानंतर भारतीयांनी संताप व्यक्त करत हा हिंदूंच्या भावनांवर हल्ला असल्याची टीका केली आहे. हे ट्वीट सध्या डिलीट करण्यात आलं आहे.
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने केलेले ट्विट शेअर करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी संताप व्यक्त केला आहे. “हा जगभरातील हिंदूंच्या भावनांवर हल्ला आहे," असं त्या म्हणाल्या आहेत.
हे फोटो युक्रेनचा खऱा चेहरा दर्शवत आहेत असं कांचन गुप्ता यांनी म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या उपपरराष्ट्र मंत्री Emine Dzhaparova भारतात आल्या होत्या. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियासह युद्ध सुरू झाल्यापासून भारताला भेट देणार्या त्या पहिल्या उच्चपदस्थ युक्रेनियन अधिकारी होत्या. मात्र या दौऱ्यानंतर काही दिवसांतच युक्रेनने हे ट्विट केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Recently #Ukraine Dy Foreign Minister was in Delhi soliciting support from #India
Behind that fakery lurks the real face of Ukraine Govt. Indian goddess Ma Kali has been caricatured on a propaganda poster.
This is an assault on Hindu sentiments around the world.@UkrembInd https://t.co/r84YlsUtZc pic.twitter.com/q7jSG0vGXH— Kanchan Gupta (@KanchanGupta) April 30, 2023
आजपर्यंत कोणत्याही देशाने अशाप्रकारे कालीमातेचा अपमान केला नव्हता अशा शब्दांत कांचन गुप्ता यांनी संताप व्यक्त केला आहे. हा द्वेषयुक्त भाषणाचा एक भाग असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही आपला संताप व्यक्त केला असून, युक्रेन मंत्रालयाला झापलं आहे. रशियाविरोधात युद्ध सुरु असताना भारताची मदत मागणाऱ्या युक्रेनने अपमान केल्याचं ते म्हणत आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, "कालीमातेची अशा पद्धतीने विटंबन करणाऱ्या युक्रेनच्या मंत्रालयाचं हे लज्जास्पद वर्तन आहे. भारताने युक्रेनला मदत दिली आहे आणि अशाप्रकारे ते त्याची परतफेड करतात. हिंदू त्यांनी माफी मागावी अशी मागणी करत आहेत".
दरम्यान एका युजरने कमेंट केली आहे की "धक्कादायक! युक्रेन संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत हँडल कालीमातेला आक्षेपार्ह स्थितीत दाखवत आहे. हे आर्ट नाही. आमची श्रद्धा हा खिल्लीचा विषय नाही. हे मागे घ्या आणि माफी मागा".
फेब्रुवारी 2022 पासून युक्रेनचं रशियासोबत युद्ध सुरु आहे. भारताने या युद्धात अद्याप कोणाचीही बाजू घेतलेली नाही. मात्र भारताने शांततेचं समर्थन केलं असून दोन्ही देशांनी चर्चा करुन तोडगा काढावा असा सल्ला दिला आहे.