मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाची झळ साऱ्या जगाला बसतेय. युद्धामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झालेत. तर दुसरीकडे शस्त्र विकणाऱ्या कंपन्या (Weapons Industry) मात्र मालामाल झाल्या आहेत. या कंपन्यांसाठी युद्धाचं बिझनेस मॉडेल कसं फायदेशीर ठरतंय. यावरच प्रकाश टाकणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. (ukraine crisis war business model decoded arms companies got rich)
एक महिना उलटला तरी रशिया-युक्रेन युद्ध थांबायची चिन्ह दिसत नाहीयेत. जिकडे पहावं तिकडे केवळ युक्रेनची बेचिराख शहरं नजरेला पडातायत. या युद्धानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. मात्र यात एक धंदा प्रचंड तेजीत आहे, तो म्हणजे शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि विक्री.
रशिया-युक्रेन युद्ध म्हणजे त्यांच्यासाठी पैसे कमावण्याची आयती संधीच..याच संधीचा फायदा घेत हत्यारं बनवणा-या कंपन्यांनी घसघशीत कमाई केलीय. महत्वाचं म्हणजे यातल्या बहुतांश कंपन्या अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये आहेत.
एकीकडे शांतीच्या गप्पा हाकायच्या आणि दुसरीकडे कमजोर देशांमध्ये अस्थिरता निर्माण करायची आणि नंतर त्यांना युद्धाच्या खाईत ढकलून शस्त्रास्त्र पुरवण्याचा धंदा करण्याचा या देशांचा खरा अजेंडा.
अमेरिकेतील लॉकहीड मार्टीन कंपनी जगभरातील अनेक देशांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करते. त्यात युक्रेनचाही समावेश आहे. युद्धापूर्वी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये या कंपनीच्या एका शेअरची किंमत 355 डॉलर म्हणजेच जवळपास 27 हजार रूपये होती.
युद्ध सुरू होताच या कंपनीचे शेअर वधारले असून आता याच कंपनीच्या एका शेअरची किंमत जवळपास 35 हजार रूपये इतकी झालीय. अशाच पद्धतीनं जर्मनीची रेहिन मेटॉल ही कंपनी देखील मालामाल झालीय. युद्धाच्या काळात या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 143 टक्क्यांची वाढ झालीय.
जगभरात शस्त्रास्त्र निर्मितीतून दरवर्षी 38 लाख कोटींची उलाढाल होते. मात्र रशिया युक्रेन युद्धामुळे हीच उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढलीय.
विशेष म्हणजे युद्धामुळे बहुतांश देशांनी संरक्षणाचं बजेट वाढवलंय. रोमानिया, स्विडन, डेन्मार्क, पोलंड या सारख्या देशांनी मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्र खरेदी करण्यास मंजुरी दिलीय.
त्याचा थेट फायदा या कंपन्यांना होतोय आणि याच पैशांचा वापर युद्धाला हवा देण्यासाठी केला जातोय, हे वेगळं सांगायची गरज नाही.