भारताला सर्वात शक्तीशाली बनवण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा

भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढतं वजन पाहता ट्रम्प प्रशासनाने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ट्रम्प प्रशासनाची अशी इच्छा आहे की, भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रात मोठी ताकद व्हावा.

Updated: Sep 7, 2017, 06:48 PM IST
भारताला सर्वात शक्तीशाली बनवण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा title=

वॉशिंग्टन : भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढतं वजन पाहता ट्रम्प प्रशासनाने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ट्रम्प प्रशासनाची अशी इच्छा आहे की, भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रात मोठी ताकद व्हावा.

इतकेच नाही तर अमेरिकेच्या प्रशासनाने दहशतवादावर चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, भारत हा खतरनाक शेजा-यांनी घेरला गेला आहे. अशात त्यांच्या क्षमतांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन कॉंग्रेसला सांगितले की, भारतासोबत सुरक्षा सहयोग द्विपक्षीय संबंधांसाठी महत्वपूर्ण स्तंभ ठरेल. ट्रम्प प्रशसनाची इच्छा आहे की, भारताने या क्षेत्रात सर्वात मोठी ताकद बनावं. 

ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, ‘ते बोईंग आणि लॉकहीड मार्टिनद्वारे देण्यात आलेले लढाऊ विमान एफ-१८ आणि एफ-१६ च्या हस्तांतरण प्रस्तावाचं जोरदार समर्थन करतात. यात सांगण्यात आलंय की, या प्रस्तावांमध्ये भारत-अमेरिका सुरक्षा संबंधांना आणखी पुढे नेण्याची क्षमता आहे. 

दक्षिण आणि मध्य आशिया प्रकरणांचे कार्यवाहक सहाय्यक परराष्ट्र मंत्री एलिस वेल्स यांनी सांगितले की, ‘भारतासोबत सुरक्षा सहयोग अमेरिकेच्या हितांसाठी महत्वपूर्ण आहे. कारण आम्हाला वाटतं की, भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रात सर्वात शक्तीशाली देश बनावा. हे क्षेत्र वैश्विक व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राचं प्रमुख केंद्र आहे. इथून जगभरातील ९० हजार वाणिज्यिक जहाजांपैकी अर्धे ये-जा करतात. तेलाच्या दृष्टीनेही हे क्षेत्र फार महत्वाचं आहे. भारत आशिया-प्रशांत क्षेत्रात पृथ्वीवरील अर्धी लोकसंख्या राहते. 

त्यांनी जोर देऊन सांगितले की, लोकशाही देश असल्याने भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांची प्राथमिकता ही दहशतवादाला संपवणे आहे. एलिस वेल्स यांनी सांगितले की, परराष्ट्र विभागाच्या दहशतवादविरोधी सहायता कार्यक्रमांतर्गत २००९ पासून ११०० भारतीय सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. ते म्हणतात की, ‘भारत हा अतिशय धोकादायक शेजा-यांनी वेढला गेला आहे. इथे होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय आणि अमेरिकी दोन्ही मारले जात आहेत. तसेच, भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रात अमेरिकेच्या सर्वात महत्वपूर्ण राजकीय भागीदारांपैकी एक आहे.