नवी दिल्ली : देशात अपघातात अनेकांचे बळी जातात. खराब रस्ते, नियम न पाळणे, हेल्मेट न घालणे, अति वेग अशी अपघाताची अनेक कारणे आहेत. केवळ आपल्या देशात नाही तर इतर देशातही अशी परिस्थिती आढळून येते. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक देशाचे आपल्या परीने प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे यांची मदत होते. तसंच रस्ते सुरक्षा मोहिम राबवून जनजागृती देखील करण्यात येते.
पण आईसलँड या देशानं मात्र रस्ते अपघात रोखण्यासाठी भन्नाट उपाय शोधून काढला आहे. वेगाची मर्यादा न पाळल्याने येथे अनेक अपघात होतात, गतिरोधक आहेत पण त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. तेव्हा ‘ऑप्टिकल इल्यूशन’ या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी रस्त्यावर लांब ठोकळ्यांचं चित्र रेखाटलं आहे. ‘ऑप्टिकल इल्यूशन’ तंत्रामुळे दूरून येणाऱ्या चालकाला रस्त्यावर ठोकळे लावण्यात आल्याचा भास होतो, त्यामुळे चालक गाडीचा वेग आपसूकच कमी करतो. या कल्पनेच सगळ्यांकडून कौतुक होताना दिसून येत आहे. फक्त आईसलँडच नव्हे, तर अनेक देशांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.