सायबेरिया : जगात अशी अनेक ठिकाण आणि गोष्टी आहेत ज्यांची रहस्य आजही कायम आहेत. शास्त्रज्ञही त्यांच्या रहस्यांवरून पडदा हटवू शकले नाहीत. यापैकी एक पूर्व सायबेरियातील हिऱ्याची खाण आहे. जी जगातील सर्वात मोठी हिऱ्याची खाण मानली जाते. ज्याचे नाव मिर्नी डायमंड माईन असं आहे. मिर्नी डायमंड माईन ही जगातील अशा प्रकारची पहिली हिऱ्याची खाण आहे जी खुली आहे.
ही खाण 1722 फूट खोल आणि 3900 फूट रुंद आहे. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मानवनिर्मित छिद्र आहे. तर बिंगहॅम कॉपर माइन ही खाण पहिल्या क्रमांकावर आहे. ही खाण 13 जून 1955 रोजी सोव्हिएत भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने शोधली होती.
दरम्यान मिर्नी डायमंड माईन या खाणीचा शोध लागल्यानंतर रशिया जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा उत्पादक देश बनला. या खाणीतून दरवर्षी 10 दशलक्ष कॅरेट हिरे काढले जात होते. ही खाण एवढी प्रचंड आहे की अनेकवेळा त्यावरून जाणारे हेलिकॉप्टर हवेच्या दाबाने खाली गेले. तेव्हापासून त्यावरून हेलिकॉप्टरच्या जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. सन 2011 मध्ये ही खाण पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
या खाणीच्या विकासाचं काम 1957 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. वर्षातील बहुतेक महिने इथलं हवामान अतिशय खराब असतं. हिवाळ्यात इथलं तापमान इतकं घसरतं की वाहनांमधलं तेलही गोठतं आणि टायर फुटतात. ते खोदण्यासाठी कामगारांनी जेट इंजिन आणि डायनामाइटचा वापर केला.
दरम्यान याचा शोध लावल्याबद्दल सोव्हिएत भूगर्भशास्त्रज्ञ यूव्ही खबार्डिन यांना 1957 मध्ये लेनिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.