अमेरिकेचे उत्तर कोरिया सोबत गुफ्तगू ?

उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांची उभ्या जगाला कल्पना आहे. या दोन्ही देशांतील संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. परंतु, असे असले तरी, दोन्ही देशांमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने कूटनीती आखली जात असल्याचे वृत्त आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 1, 2017, 04:09 PM IST
अमेरिकेचे उत्तर कोरिया सोबत गुफ्तगू ? title=

वॉशिंग्टन : उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांची उभ्या जगाला कल्पना आहे. या दोन्ही देशांतील संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. परंतु, असे असले तरी, दोन्ही देशांमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने कूटनीती आखली जात असल्याचे वृत्त आहे.

परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे अधिकारी प्योंगयांगच्या संयुक्त राष्ट्र मिशनच्या माध्यमातून उत्तर कोरियाच्या राजदूतांच्या संपर्कात आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी १७ ऑक्टोबरला या दिवशी एक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत ते म्हणाले होते की, पहिला बॉम्ब पडेपर्यंत प्योंगयांगसोबत आम्ही कूटनीती सुरूच ठेऊ. या प्रतिक्रियेच्या आधारे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते की, या प्रतिक्रियेचा थेट अर्थ असा आहे की, अमेरिका ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतरही उत्तर कोरियाशी थेट बोलणी करत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या वतीने जोसेफ यन या प्रकरणात कुटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, जोसेफ यन यांनी हेही स्पष्ट केले आहे की, उत्तर कोरियाने आपला अण्वस्त्र आणि अतिसंहारक शस्त्रनिर्मीतीचा कार्यक्रम बंद करायला हवे.

दरम्यान, दोन्ही देशात कूटनीती सुरू असली तरी, दोन्ही देशाच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये मात्र तुंबळ शाब्दीक युद्ध सुरू आहे.