श्रीलंकेत परिस्थिती बिकट, देश सोडून भारतात येऊ लागले लोकं

Sri lanka Economic Crisis : श्रीलंकेत परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे लोकं देश सोडून जावू लागले आहेत.

Updated: Mar 23, 2022, 05:06 PM IST
श्रीलंकेत परिस्थिती बिकट, देश सोडून भारतात येऊ लागले लोकं title=

मुंबई : श्रीलंकेत परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. इंधनाचे दर वाढल्याने महागाई देखील वाढली आहे. इतर जीवनावश्यक वस्तू देखील मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत. अनियंत्रित महागाई आणि आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील लोकं आता देश सोडून जात आहेत. श्रीलंकेतील लोक आपला देश सोडून भारतात येत आहेत. मंगळवारी 16 श्रीलंकन ​​तमिळ नागरिकांनी (Tamil families) आपला देश सोडला आणि भरपूर पैसे देऊन बोटीने तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पोहोचले. या लोकांमध्ये चार महिन्यांच्या नवजात बालकाचाही समावेश आहे. (Tamil families to take illegal ferries out of Sri Lanka to India)

श्रीलंकेतील जाफना आणि तलाईमन्नार येथून दोन गटात हे लोक तामिळनाडूत पोहोचले. पहिल्या गटात तीन मुलांसह सहा जणांचा समावेश होता. श्रीलंकेतील या लोकांमध्ये चार महिन्यांचा मुलगा असलेल्या जोडप्याचा समावेश आहे. हे सर्व लोक फायबर बोटीतून किनारपट्टीवर पोहोचले जेथे तटरक्षक दलाने त्यांची सुटका केली. दुसऱ्या गटात पाच मुले आणि तीन महिलांसह १० जणांचा समावेश होता.

6 जणांच्या गटाने भारतातील अधिकाऱ्यांना सांगितले की, सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. बेरोजगारीही शिगेला पोहोचली आहे, म्हणून त्यांनी आपला देश सोडला.

प्राथमिक चौकशीत ते जाफना आणि तलाईमन्नार येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांची चौकशी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व सहा श्रीलंकन (Sri Lankan) ​​तामिळ नागरिक रात्री दहाच्या सुमारास श्रीलंकेतून एका बोटीत बसले. सोमवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडली. ज्या खलाशीने त्यांना आणले होते त्याने लोकांना एका छोट्या बेटावर सोडले आणि खोटे बोलले की रामेश्वरमहून कोणीतरी त्यांना घेण्यासाठी येईल.

प्रत्येक व्यक्तीने भारतात येण्यासाठी 10 हजार दिले

जाफनाहून तामिळनाडूत आलेल्या रणजीत कुमार यांचा २४ वर्षीय मुलगा गजेंद्रन याने सांगितले की, त्यांनी बोटीच्या प्रवासासाठी १०,००० रुपये दिले होते. हे पैसे त्याला नातेवाईकाने दिले होते.

गजेंद्रन याने पत्रकारांना सांगितले की, 'मी जाफनामधील एक कामगार आहे. अलीकडेच मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. माझ्याकडे एक पैसाही नाही. रामेश्वरममध्ये माझे काही नातेवाईक आहेत. म्हणून मी इथे यायचं ठरवलं...'

'आमच्याकडे खायला काही नाही'

गजेंद्रन याची पत्नी मेरी क्लेरिन्स (२३) हिने सांगितले की, त्यांनी सोमवारी दुपारीच जेवण केले होते, 'दुपारी चार वाजल्यापासून आम्ही किनाऱ्यावर बोटीची वाट पाहत होतो. माझा मुलगा निजथ चार महिन्यांचा आहे. सोमवारपासून आमच्याकडे खायला काही नव्हते.

या ग्रुपमध्ये असलेल्या 28 वर्षीय देवरीने सांगितले की तिला दोन मुले आहेत - 9 वर्षांची एस्थर आणि 6 वर्षांचा मोशे., 'श्रीलंकेतील परिस्थिती धोकादायक होती. कष्टकरी लोकांना खायला काहीच नाही. मला काम करायचे होते पण मी माझ्या दोन मुलांना एकटे सोडू शकत नाही. त्यामुळे माझे काही नातेवाईक असलेल्या भारतात यायचे ठरवले. बोटीने भारतात येण्यासाठी 10 हजार रुपये मोजावे लागल्याचे महिलेने सांगितले.

भारतीय तटरक्षक दलाने सर्व लोकांची ओळख पटल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सर्व श्रीलंकन ​​नागरिकांना रामेश्वरमजवळील मंडपम येथील निर्वासित छावणीत हलवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या हवाल्याने सांगितले.