भारतासाठी चीन बनणार 'सख्खा शेजारी, पक्का मित्र'?

'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणा सत्यात उतरु शकेल?

Updated: Oct 12, 2019, 01:31 PM IST
भारतासाठी चीन बनणार 'सख्खा शेजारी, पक्का मित्र'? title=

नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सध्या दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची आज कोवलम स्थित ताज फिशरमॅन हॉटेलच्या कोव रिसॉर्टमध्ये दुसरी अनौपचारिक भेट पार पडली. या दरम्यान पंतप्रधानांनी आपल्या पाहुण्या नेत्याला सिल्क शॉल भेट दिली. उल्लेखनीय म्हणजे, या शॉलवर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची छबी साकारण्यात आलीय. चीन भारताचा सख्खा शेजारी... सख्खा शेजारी असूनही चीन कधी पक्का मित्र बनू शकला नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचशील तत्वांचा स्वीकार करुन चीनशी मैत्रीचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण चीननं १९६२ मध्ये युद्ध पुकारून दोन्ही देशात कटूता निर्माण केली. ही कटूता घेऊन जवळपास पन्नास वर्ष दोन्ही देशांनी आपापल्या दिशेनं वाटचाल केली. 


शी जिनपिंग यांना भेट देण्यात आलेली शॉल

 

पण आज दोन्ही देश एकमेकांसोबत मैत्री ठेऊ पाहत आहेत. चीन ही जगातल्या सर्वात मोठ्या अर्थसत्तांपैकी एक आहे. तर भारत हा जगातली अर्थसत्ता बनू पाहतेय. जगाच्या एकूण लोकसंख्येपैंकी चीन आणि भारतात सर्वाधिक लोकसंख्या राहतेय. अशावेळी भारत आणि चीन यांच्यातली कटूता संपवून दोघांनीही एकमेकांशी मैत्री करायला हवी. यात दोन्ही देशांचं हित आहे. 

याच मैत्रीपर्वाला सुरुवात झाली सप्टेंबर २०१४ साली शी जिनपिंग अहमदाबाद भेटीवर आले. साबरमती नदीकाठी दोन्ही नेत्यांनी झोपाळ्यावर बसून चर्चा केली. त्यावेळीही दोघा नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण चर्चा झाली होती. 

आता दोन्ही नेते पुन्हा महाबलीपूरम शहरात भेटले. दोघांमध्येही अनौपचारिक चर्चा झाली. शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यातली ही भेट दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाची आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं नातं दृढ होणार आहे.

कटुता संपवून दोन्ही देशांना मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण करायचे आहेत. त्यासाठी एक दोन भेटी पुरेशा नाहीत. दोन्ही देशांमध्ये अजून वेगवेगळ्या पातळीवर मैत्रीचे संबंध प्रस्थापित होण्याची गरज आहे. तेव्हाच 'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणा सत्यात उतरु शकेल.