लाडक्या राजाच्या अंत्यसंस्कारांसाठी तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च!

सिनेमांसाठी, लोकोपयोगी प्रकल्पांसाठी नाहीतर लग्नसोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे आपण ऐकले असेल.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 25, 2017, 08:15 PM IST
लाडक्या राजाच्या अंत्यसंस्कारांसाठी तब्बल 'इतक्या' कोटींचा खर्च! title=
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

मुंबई : सिनेमांसाठी, लोकोपयोगी प्रकल्पांसाठी नाहीतर लग्नसोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे आपण ऐकले असेल. पण अंत्यसंस्कारासाठी कोट्यवधी खर्च केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण अशी एक घटना घडली आहे थायलंडमध्ये. आपल्या लाडक्या राजाच्या अंत्यसंस्कारांसाठी थायलंडने एक दोन नव्हे तब्बल ५८५ कोटी खर्च केले आहेत. 

थायलंडचे राजे भूमीबोल अदुल्यदेज यांच्या विषयी जनतेमध्ये एक वेगळाच आदर होता. आपल्या प्रजेची मने त्यांनी जिंकली होती. अनेकांसाठी तर ते देवस्वरूप होते. त्यांनी ७० वर्षांहून अधिक काळ थायलंडवर सत्ता गाजवली. गेल्यावर्षी म्हणजे १३ ऑक्टोबर २०१६ मध्ये वयाच्या ८८ वर्षी त्यांचे निधन झाले. पब वर्षभरानंतर म्हणजेच २६ ऑक्टोबरला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हा विधी दोन दिवस चालणार आहे. 

थायलंडच्या पारंपरिक रितीरिवाजानुसार त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करून थायलंडचं राजकुटुंब आणि सैनिक उपस्थित असतील. त्यानंतर राजांच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.

ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, तिथे सोन्याचा कळस असलेली प्राचीन थाय पद्धतीची इमारत उभारण्यात आली आहे. अंत्यसंस्काराची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू असून, हजारो कारागीर त्यासाठी दिवस-रात्र  काम करत आहेत. अडीच लाखांहून अधिक लोक त्यांच्या अंत्ययात्रेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जगभरातील अनेक मोठे नेते आणि शाही कुटुंबातील सदस्यदेखील राजाच्या अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सरकारने १ दिवसाची सुट्टी देखील जाहीर केली आहे.