पैसा कमावणं हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. एकीकडे काहींना एक रुपया कमवालयाही दिवस-रात्र संघर्ष करावा लागतो. तर दुसरीकडे काहीजण मात्र घरबसल्या करोडो रुपये कमावत असतात. एकीकडे फक्त मेहनत असते तर दुसरीकडे मेहनतीला आर्थिक हुशारीची जोड असल्यानेच हे शक्य होतं. अशाच लोकांमध्ये स्टीव्ह बाल्मरदेखील आहेत. त्यांना 2024 मध्ये काही न करण्याचे तब्बल 1 अरब डॉलर्स मिळणार आहेत. भारतीय रुपयांमध्ये मोजायचं झाल्यास ही रक्कम 8300 कोटी आहे. स्टीव्ह बाल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे 33.32 कोटी शेअर्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे कंपनीची 4 टक्के भागीदारी आहे.
स्टीव्ह बाल्मर यांना 1 अरब डॉलर्स डिव्हिडंटच्या माध्यमातून मिळणार आहेत. मायक्रोसॉफ्ट एक डिव्हिडंट पेइंग कंपनी आहे. 2003 पासून कंपनीच्या डिव्हिडंटमध्ये सतत वाढ होत आहे. मायक्रोसॉफ्ट 2024 पासून प्रत्येक शेअरवर 3 डॉलर्सचा डिव्हिडंट देऊ शकते. फक्त याच डिव्हिडंटच्या माध्यमातून स्टीव्ह बाल्मर 8300 कोटींची कमाई करणार आहेत. डिव्हिडंटचा शेअर्सच्या कामगिरीशी काही संबंध नाही. जरी डिव्हिडंटची घोषणा केली आणि शेअर्स खराब कामगिरी करत असले तरीही भागधारकाला घोषित लाभांशाची रक्कम मिळेल.
स्टीव्ह बाल्मर यांच्या कमाईचा फायदा फक्त त्यांनाच होणार नाही. त्यांच्यासह अमेरिकेच्या महसूल विभागालाही फायदा होणार आहे. अमेरिकेत एक वर्षात 5 लाख डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त कमाई केल्यास 20 टक्के कर भरावा लागतो. स्टीव्ह बाल्मर यांच्या डिव्हिडंटमधून होणाऱ्या कमाईवरील कर भरावा लागणार आहे. सीएनएनच्या एका वृत्तानुसार, बाल्मर यांना 20 कोटी डॉलर्स म्हणजेच 1600 कोटींचा कर भरावा लागणार आहे.
स्टीव्ह बाल्मर यांच्यासह शेअर बाजारातील दिग्गज वॉरेन बफेही तगडी कमाई कऱणार आहेत. एका अंदाजानुसार, 2024 मध्ये ते डिव्हिडंटच्या माध्यमातून 6 अरब डॉलर्सची कमाई करणार आहेत. त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवे शेवरॉन, बँक ऑफ अमेरिका, ऍपल, कोका-कोला आणि अमेरिकन एक्सप्रेस सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते. या सर्व कंपन्या डिव्हिडंट देतात.
शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्या आपल्या नफ्यातील काही भाग भागधारकांना देतात. प्रत्येत लिस्टेड कंपनी असं करतंच असं नाही. पण अनेक कंपन्या ही पद्धत अवलंबतात. यामुळे त्यांच्या शेअर्सची विश्वासार्हता वाढते आणि लोक त्यांच्या शेअर्सची अधिक खरेदी करतात. मोठ्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंटचा सर्वाधिक फायदा होतो. अनेक वेळा ते शेअर्समध्ये झालेल्या घसरणीची भरपाई डिव्हिडंटच्या माध्यमातून करतात. तथापि, जर शेअर घसरला तर डिव्हिडंटचा विशेष फायदा नाही.