कोलंबो : कर्जाखाली दाबल्या गेलेल्या श्रीलंकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. चीनच्या कर्जाच्या जाळ्यात फसलेल्या श्रीलंकेला आता यातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध, साखर, तांदूळ अशा वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. ज्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसू लागला आहे. देशात परिस्थिती इतकी वाईट आहे की, कागदं नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
श्रीलंकेच्या शैक्षणिक प्रकाशन विभागाचे आयुक्त पी.एन. इलापेरुमा यांनी माहिती देताना म्हटलं की, कागद आणि इतर संबंधित वस्तूंच्या तुटवड्यामुळे शालेय पुस्तकांच्या छपाईला उशीर होत आहे. इंधनाच्या संकटामुळे शाळांना पुस्तकांचे वितरणही वेळेत होत नाही आहे.
तेल आणि इंधनाचे दर गगणाला भिडले आहेत. पंपावर लोकांची मोठी लाईन लागली आहे. सरकारच्या विरोधात लोकं संतापले आहेत. पेट्रोल पंपावर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला सैन्याला तैनात करावे लागले आहे.
वाढती महागाई आणि रोजगार नसल्याने आा लोकं देश सोडून जावू लागले आहेत. तमिळ नागरिक रोजगार आणि अन्नासाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतात घुसखोरीची शक्यता वाढली आहे.
श्रीलंका अनेक जीवनावश्यक वस्तू आयात करते. ज्यामुळे त्यांना इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याने वस्तूंचे दर गगणाला भिडत आहेत.
देश पर्यटनातून $3.6 बिलियन कमावतो. पण कोरोनामुळे त्याच्यावर देखील मोठा परिणाम झाला आहे. रशिया, युक्रेन, पोलंड आणि बेलारूसमधून श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात लोकं पर्यटनासाठी येतात. दुसरीकडे रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे देखील मोठा फटका त्यांना बसत आहे.
चीनकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेल्या श्रीलंकेला आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाहीये. भारताकडून देखील त्यांनी आता मदत म्हणून कर्ज घेतलं आहे. पण येणारा काळ श्रीलंकेसाठी मोठा संघर्षाचा असणार आहे.