काय सांगता? दक्षिण कोरियातील सर्व नागरिकांचं वय एका दिवसात एक- दीड वर्षानं कमी

South Korea age system : वयाचा आकडा घोळ घालू शकतो. कसा ते दक्षिण कोरियातील एका नव्या सिस्टीममुळं तुमच्या लक्षात येईलच. अहो इथं वेगळीच प्रथा होती...   

सायली पाटील | Updated: Jun 28, 2023, 05:37 PM IST
काय सांगता? दक्षिण कोरियातील सर्व नागरिकांचं वय एका दिवसात एक- दीड वर्षानं कमी title=
south korea changed traditional way counting age scrapped korean age system read latest news

South Korea age system : तुमचं वय काय हो? असं विचारलं असता दोन गट पडतात. एक म्हणजे सरसकट वयाचा खराखुरा आकडा सांगणारी मंडळी आणि दुसरा गट म्हणजे वयाचा आकडा दोन-तीन वर्षांनी कमी सांगणारी मंडळी. आता यापेकी तुम्ही कोणत्या गटात येता हे तुम्हीच ठरवा. तूर्तास वयाचा विषय अचानकच निघण्याचं कारण म्हणजे जगातील एका देशात लागू झालेली नवी व्यवस्था. किंबहुना इथं तुम्ही जर आता कोणाला 'वय किती?' असा प्रश्न विचारला तर, तुम्हाला चुकीचं उत्तर मिळू शकतं. 

अर्थात हे उत्तर जाणीवपूर्वक देण्यात आलेलं नसेल. कारण, ओघाओघानं ही मंडळी जुनंच वय सांगतील. वयाची ही आकडेमोड अधिक सोपी करून सांगावी तर, दक्षिण कोरियामध्ये वय मोजण्याच्या पारंपरिक व्यवस्थेतट मोठे बदल करण्यात आले आहेत. किंबहुना जुनी प्रणाली रद्द करत एक नवी पद्धत दक्षिण कोरियामध्ये लागू करण्यात आली आहे. हा देश आता जगातील इतर देशांप्रमाणंच त्यांच्या नागरिकांचं वय सांगणार आहे. ज्यामुळं नागरिकांचं वय एका दिवसात 25 वरून 24-23 वर पोहोचलं आहे. 

जन्मतारीख महत्त्वाची 

दक्षिण कोरियामध्ये इथून पुढं जन्मतारखेच्याच अनुषंगानं वयाचा आकडा ठरवा जाईल. याआधी इथं एक वेगळी व्यवस्था लागू होती. जगभरात ही पद्धत 'कोरियन एज सिस्टीम' म्हणूनही प्रचलित होती. या प्रणालीअंतर्गत जन्माच्याच वेळी बाळाचं वय 1 वर्ष सांगितलं जायचं. त्यामुळं पहिल्या वाढदिवशी बाळाचं वय दोन वर्षे असायचं. कारण, त्यांच्या वयाचं पहिलं वर्ष हे आईच्या गर्भात असल्याच्या काळापासूनच मोजलं जात होतं. परिणामी मूल जन्मताच ते 1 वर्षाचं सांगितलं जात. 

लक्षात घ्या.. 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत वय पारंपरिक पद्धतीनं गणलं जात असलं तरीही इथं कायदेशीर आणि शासकीय कामांसाठी मात्र आंतरराष्ट्रीय प्रणालीनुसारच वयाचा आकडा ग्राह्य धरला जात होता. आता मात्र इथं वयाचा एकच आकडा अधिकृत मानला जाईल. 

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांनी फार आधीपासूनच वय मोजण्याच्या जुन्या पद्धतीला संपुष्टात आणण्यासाठी आवाज उठवला होता. किंबहुना निवडणुकांच्या काळात या विषयावर त्यांनी प्रचारही केला होता. या दरम्यान, कोरियामध्ये बरीच मतमतांतरंही झाल्याचं पाहायला मिळालं.