मुंबई : जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. सोमवारी राज्यसभेमध्ये आणि मंगळवारी लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाच्या बाजूने भाषण केलं. आज जम्मू-काश्मीर घेतलं आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर घेऊ. अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतील याचा विश्वास आहे, असं संजय राऊत राज्यसभेमध्ये म्हणाले. संजय राऊत यांच्या या संदेशाचे बॅनर इस्लामाबादमध्ये झळकले.
याप्रकरणी इस्लामाबादमधल्या पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतल्याचं वृत्त बीबीसी हिंदीने दिलं आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनाने नगर पालिकेला हे पोस्टर हटवायला ५ तास का लागले? याबाबत नोटीस पाठवली आहे. इस्लामाबादचे पोलीस इन्सपेक्टर असजद महमूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ही बॅनर फक्त आमच्या हद्दीत नाही तर इतर ठिकाणीही लावण्यात आली होती. याबाबत माहिती मिळताच आम्ही बॅनर हटवायला सुरुवात केली.'
स्थानिक पत्रकार जेव्हा या बॅनरचे फोटो काढायला गेले, तेव्हा पोलिसांनी त्यांना फोटो काढण्यापासून रोखलं. पोलिसांनी रेड झोनमधल्या फाईव्ह स्टार हॉटेलशिवाय जवळपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची रेकॉर्डिंग घेतली आहेत. यामुळे बॅनर लावणाऱ्यांची ओळख पटेल, असा पोलिसांनी सांगितलं.
ज्या ठिकाणी ही बॅनर लावण्यात आली तिथून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आणि आयएसआय मुख्यालय जास्त लांब नाही. रेड झोन परिसरात अनेक देशांचे दुतावास, तसंच परराष्ट्र मंत्रालय आणि खास इमारती आहेत. त्याठिकाणी अशी बॅनर लागल्याने जिल्हा प्रशासन, पोलीस आणि इतर यंत्रणांवर प्रश्न उपस्थित होतात, असं इस्लामाबादचे माजी पोलीस अधिकारी अकबर हयात बीबीसीशी बोलताना म्हणाले.
इस्लामाबादमध्ये बॅनर लावताना प्रशासनाची परवानगी घेणं अनिवार्य आहे. अशा प्रकारचे बॅनर लावण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असं इस्लामाबादच्या प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू आहे, ज्यामुळे सरकारविरोधी किंवा धार्मिक उन्माद वाढवणारी पोस्टर लावायला बंदी आहे.