Russia Ukraine War : रशियामध्ये युक्रेनविरोधातील मोहिम आता काहीशी मागे पडत असून, याच देशातील वॅगनर तुकडीनं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. पुतिन यांच्या साम्राज्याला धक्का देणारा हा उठाव आता रशिया- युक्रेन युद्धाला एक नवी दिशा देणार असून, आणखी एका युद्धाला यामुळं वाव मिळू शकतो अशी भीती जागतिक घडामोडींच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या घडीला रशियामध्ये वॅगनर तुकडीचे जवान मोठ्या संख्येनं मॉस्कोच्या दिशेनं कूच करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी रशियन सैन्यही तैनात असून, या दोन्ही तुकड्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचंही वृत्त आहे. कधीएकेकाळी रशियाच्या सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या या वॅगनर तुकड्या आता मात्र पुतिन यांच्याविरोधात युद्ध पुकारत आहेत. हे खासगी लष्कर आणि त्यांचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी आतापर्यंत बऱ्याचदा रशियाच्या सैन्याचा आणि धोरणांचा विरोध करत निंदात्मक सूर आळवला. आता मात्र ते जाहीरपणे पुतिन (vladimir putin) यांच्याच सैन्याला आव्हान देत आहेत.
येवगेनी प्रिगोझिन यांना 1981 मध्ये दरोडा घालण्याप्रकरणी दोषी ठरवत तब्बल12 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कारावासातून परतताना त्यांनी साधारण 1990 च्या सुमारास सेंट पिटर्सबर्ग येथे रेस्तराँ सुरु केले. इथूनच सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि तेव्हाचे शहराचे उप महापौर असणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांच्याशी त्यांची ओळख झाली.
ही ओळख प्रिगोझिन यांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरात आणली आणि रशियन सैन्याकडून अनेक करार मिळवले. इथूनच त्यांना “Putin’s chef” हे नाव आणि ही नवी ओळख मिळाली. 2012 मध्ये त्यांना मॉस्कोतील शाळांमध्ये भोजन व्यवस्था पुरवण्यासाठी तब्बल 10.5 बिलियन रुबल इतक्या रकमेचं काम मिळालं. पुढे त्यांचं नाव इतरही क्षेत्रांमध्ये चर्चेत येऊ लागलं. माध्यमांमध्ये आणि इंटरनेटवर त्यांची चर्चा होऊ लागली. हा तोच चेहरा आहे, जो आज जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखांविरोधात उभा ठाकला आहे.
2014 मध्ये रशियानं क्रिमीयावर वर्चस्व प्रस्थापित केलं आणि प्रिगोझिन य़ांनी त्यांच्या वॅगनर तुकडीची ताकद वाढवली. दरम्यानच्या काळात ते रशिया आणि युक्रेन सैन्यातील संघर्षातही सहभागी होते. पुतिन यांना खासगी लष्करी संस्था स्थापन करण्याचा सल्ला प्रिगोझिन यांनीच दिला. रशियातील एका माजी लष्कर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रिगोझिन यांची तुकडी सुरुवातीला रशियातील गुप्तचर यंत्रणेचा भाग असली तरीही ती प्रिगोझिन यांच्या नेतृत्त्वाखालील तुकडी होती हे विसरून चालणार नाही. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून त्यांच्या तुकडीसाठी दक्षिण रशियातील मोल्किनोमधचा भूखंड प्रदान करण्यात आला. सुरुवातीला इथं मुलांसाठीची शिबिरं सुरु झाली. पुढे या नावाखाली तिथं लष्करी तळ सुरु झाले.
आता मात्र वॅगनर तुकडीच्या आडून प्रिगोझिन यांची भूक वाढत होती. 2014 मध्ये रशियन संरक्षण मंत्रालय आणि या गटामध्ये लष्कराला भोजन देण्यासाठीची चर्चा सुरु झाली पण ती निकाली निघाली नाही. 2015 पर्यंत त्यांच्या कंपनीला लष्कराच्या भोजनव्यवस्थेसाठी तब्बल 92 बिलियन रुबल (£ 1 बिलियन) हून अधिक रकमेचा करार मिळाला.
प्रिगोझिन यांची ताकद दिवसागणिक वाढतच गेली आणि रशियाचं संरक्षण मंत्रालय चिंतेत पडलंय. आता तर हा गट रशियातच उठाव करत असल्यामुळं आता ही ताकद पुतिन रोखू शकणार का? यावर संपूर्ण जगाची नजर असेल.