Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध कशामुळे लांबलं? रस्त्यावर उतरलेली युक्रेनची गुप्तसेना कोण?

युक्रेनची गुप्तसेना रशियाच्या नाकी नऊ आणतेय. युक्रेनची ताकद कितीतरी कमी असली तरी नागरिकांची सेना बलाढ्य रशियाला पुरून उरतेय.   

Updated: Feb 28, 2022, 10:37 PM IST
Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध कशामुळे लांबलं? रस्त्यावर उतरलेली युक्रेनची गुप्तसेना कोण? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : युक्रेनची गुप्तसेना रशियाच्या नाकी नऊ आणतेय. युक्रेनची ताकद कितीतरी कमी असली तरी नागरिकांची सेना बलाढ्य रशियाला पुरून उरतेय. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर हे युद्ध १ ते २ दिवसांत संपेल असा अंदाज लावला जात होता. मात्र रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध अपेक्षेपेक्षा जास्तच पेटत चाललंय. ( russia ukraine war update crisis marathi news nato) 

रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद कितीतरी कमी. रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसले खरे. मात्र त्यांना युक्रेनच्या फौजांसह अनपेक्षित गुप्त सेनेचा सामना करावा लागतोय. या धक्कातंत्रामुळे रशियाला युक्रेनसोबतचा लढा जरा जिकिरीचा ठरतोय. कारण थेट जुक्रेनची जनताच आपल्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलीय. रशियन फौजा शहरात घुसल्यावर त्यांचा मुकाबला करण्यासाठी जनतेने जागोजागी रस्ते खोदून बंकर उभे केलेत.

 युक्रेनच्या नागरिकांना रायफलींचं वाटप करण्यात आलंय. रायफली घेऊन हे सैनिक रशियन सैनिकांना रोखत आहेत. छोट्या छोट्या गावातूनही रशियन सैनिकांचा कडवा प्रतिकार केला जातोय. रशियन सैन्य अजूनही पूर्व युक्रेनमध्ये आहे. मध्य युक्रेनमध्ये रशियन शिरलेले नाहीत. या काळात इथल्या नागरिकांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलंय.

रायफल चालवणं, लढणा-या सैनिकांना मदत करणं, य़ुद्धजन्य स्थितीत सैनिकांपर्यंत मदत साहित्य पोहोचवणं, गावाची सुरक्षा करणं, शत्रूला एका जागी रोखून धरणं, जखमी सैनिकांना युद्धभूमीतून बाहेर आणणं, सैनिकांना तातडीनं हॉस्पिटलला नेणं, प्रथमोपचार करणं, असं मोठं प्रशिक्षण युक्रेनच्या नागरिकांना देण्यात आलंय.

रशियन सैन्याविरोध युक्रेन कवी झुंज देत आहे. युक्रेनच्या सौंदर्यवती, टेनिसपटू यांनीही हाती बंदुका घेतल्या आहेत. रशियाचे जवळपास साडेचार हजार सैनिक ठार केल्याचा दावा युक्रेननं केलाय. याशिवाय रणगाडे, इतर चिलखती गाड्या यांना नागरिक निधड्या छातीने सामोरे जात आहेत. 

काही ठिकाणी नागरिकांनी रणगाडेच जाळल्याचीही उदाहरणं आहेत. रशियन फौजांना हा कडवा प्रतिकार अपेक्षित नव्हता. त्यामुळेच नागरिकांची ही फौज रशियन सैनिकांना भारी पडतेय. युक्रेनी नागरिकांसाठी आता ही करो या मरोची लढाई आहे.